खोपोलीत खाचखळग्यातूनच प्रवास!

अनिल पाटील 
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

खोपोली - मागील पावसाळ्यात रस्त्यांना पडलेले खड्डे कायम असताना वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकण्याकरता आणि आता रिलायन्स जिओच्या केबलसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक सर्वच रस्त्यांत खड्डे पडले आहेत. एप्रिल निम्मा संपला तरी रस्त्यांच्या कामाला मुहूर्त मिळाला नसल्याने खाचखळग्यांतूनच नागरिकांचा प्रवास सुरू आहे. 

खोपोली - मागील पावसाळ्यात रस्त्यांना पडलेले खड्डे कायम असताना वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकण्याकरता आणि आता रिलायन्स जिओच्या केबलसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक सर्वच रस्त्यांत खड्डे पडले आहेत. एप्रिल निम्मा संपला तरी रस्त्यांच्या कामाला मुहूर्त मिळाला नसल्याने खाचखळग्यांतूनच नागरिकांचा प्रवास सुरू आहे. 

पालिकेचा १७६ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना ‘स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोली’चा नारा देऊन शहरातील रस्तेदुरुस्ती व डांबरीकरणासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली. अनेक रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे प्रस्ताव यापूर्वीच मंजूर झाले आहेत. मात्र एप्रिल निम्मा संपला तरी या कामांना मुहूर्त मिळत नसल्याचे दिसते. बांधकाम विभागातील अपुरे कर्मचारी, तांत्रिक मंजुरी, निविदा प्रसिद्धी व मंजुरी आदी प्रशासकीय स्तरावरील कामांची पूर्तता होत नसल्याने रस्त्यांची कामे रखडली आहेत, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. 

पालिका सभेत मंजूर झालेली कामे अनेक महिने फायलींतच अडकली असल्याने नगरसेवकांचा संतापाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. खोपोली पालिका कार्यालयात मुख्याधिकारी असले, तर नगराध्यक्ष नसतात. कधी नगराध्यक्ष असले, तर मुख्याधिकारी कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असतात, असा लपंडाव तीन-चार महिने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांसह अनेक विकासकामांच्या मंजुरीच्या फायली बाहेरच येत नसल्याचे बोलले जात आहे. रस्त्यांची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी व्हावीत, असा अलिखित तांत्रिक नियम आहे; मात्र अद्याप कोणत्याही रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शहरातील सर्व प्रभागातील प्रमुख रस्त्यांत खड्डे पडले आहेत. रिलायन्स जिओ कंपनीने रस्त्यांच्या नुकसानीसंदर्भात पालिकेकडे ६८ लाख भरले आहेत, असे प्रशासन सांगत आहे. डांबरीकरणासाठी पालिकेने तब्बल २० कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र कामांना मुहूर्त मिळत नसल्याने खड्ड्यांतूनच नागरिकांची वाटचाल सुरू आहे. 

निवडणुकीपूर्वी आणि नंतर झालेल्या पालिका सभेत शेकडो कामांना मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात अद्याप एकही काम सुरू झाले नाही. अनेक रस्त्यांची कामेही मंजूर आहेत. प्रशासकीय प्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याने आणि पालिकेच्या बांधकाम विभागात कार्यक्षम अभियंत्याची कमतरता असल्याने ही सर्व कामे रखडली आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही उत्तम रस्त्यांचे आश्‍वासन मतदारांना दिले आहे; परंतु कामे होत नसल्याने मतदारांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ नगरसेवकांवर येत आहे.
- बेबीशेठ सॅम्युअल, नगरसेवक, खोपोली.

नेहमीप्रमाणे यंदाही पावसाच्या तोंडावर किंवा प्रत्यक्ष पावसाळा सुरू होईल तेव्हाच शहरातील रस्त्यांची कामे घाईने उरकण्यात येतील, असे वाटतेय. दरवर्षी असेच घडते. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण केलेले रस्ते पावसाळ्यात पहिल्या दोन महिन्यांतच उखडले जातील. खोपोलीत रस्त्यांची कामे म्हणजे आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठीची मोठी संधी असल्याचेच येथील प्रशासनासह संबंधित ठेकेदार, लोकप्रतिनिधींना वाटते. त्यामुळे जाणीवपूर्वक या कामांना उशीर केला जातो. 
- रिचर्ड जॉन, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली.

रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तांत्रिक बाबी व प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर रस्त्यांची दुरस्ती आणि डांबरीकरणाची कामे सुरू होतील.
- डॉ. दीपक सावंत, मुख्याधिकारी, खोपोली पालिका.