आंबोली धबधबा अडकला सिमावादात; नाव बदलण्याच्याही हालचाली

Amboli waterfall
Amboli waterfall

सावंतवाडी : आंबोली आणि पारपोली या दोन ग्रामपंचायतीत झालेल्या सिमावादात वर्षा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर झळकलेला आंबोली मुख्य धबधबा सापडला आहे. हा धबधबा पारपोलीच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याचे नाव बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी गोपनिय बैठका सुरू आहेत. याला आंबोली ग्रामस्थांचा विरोध असून काही झाले तरी आम्ही नाव बदलण्यास देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

आंबोली घाटाला आणि येथील वर्षा पर्यटनाला मुख्य आंबोलीच्या धबधब्यामुळे ओळख मिळाली आहे. हा धबधबा आता जगाच्या नकाशावर झळकला आहे. त्यामुळे दिवसाकाळी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देताना दिसतात; मात्र यावर्षी पासुन आंबोली धबधब्याच्या या विकासात सिमावाद आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटन स्थळाचा विकास व्हावा, यासाठी आंबोली धबधब्याला भेट देणार्‍या पर्यटकांकडुन प्रत्येकी दहा रुपये पर्यटन कर घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची अमंलबजावणी सुध्दा करण्यात आली. आज पावसाळ्याच्या अखेरीस त्याठिकाणी नेमण्यात आलेल्या समितीकडे दहा लाखाहून अधिक रक्कम कराच्या स्वरुपात गोळा झाली आहे. येणार्‍या काळात हा आकडा वाढणार आहे.

त्यातून मिळणारे लाखो रुपये हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. तो धबधबा आपल्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यातून मिळणारे उत्पन्न आपल्यालाच मिळावे, असा प्रयत्न पारपोली आणि आंबोली या दोन्ही ग्रामपंचायतीकडुन सुरू करण्यात आला आहे. वनविभाग आणि महसुल विभागाने कागदपत्राच्या आधारे दिलेल्या माहीतीनुसार आंबोली धबधबा हा पारपोली गावच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याची देखरेख आणि मिळणारे उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे, अशी मागणी पारपोली ग्रामस्थांकडुन करण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता थेट या धबधब्याचे नाव ‘शिवमुख धबधबा पारपोली’ असे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी ग्रामस्थ आणि वनसमितीच्या गुप्त बैठका सुरू आहेत. त्यात आचारसंहीता असल्यामुळे त्यांना उघड कोणतीही भूमिका घेणे शक्य नाही.

या नाव बदलाच्या प्रक्रीयेला आंबोली आणि चौकुळ ग्रामस्थांनी विरोध केला आहे. इतकी वर्षे हा आंबोली धबधबा या नावानेच ओळखला जात होता. त्यामुळे काहीही झाले तरी आम्ही त्याचे नाव बदलण्यास देणार नाही, अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतली आहे; मात्र दोन गावात वाद लावण्यासाठी वनविभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप सुध्दा आंबोली चौकुळ ग्रामस्थाकडुन करण्यात आला. विद्यमान उपसरपंच धबधब्याच्या ठिकाणी कर वसूली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात बसतात ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे असा प्रकार करू शकत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या सर्व वादात राजकीय नेत्याची भूमिका महत्वाची आहे. काही झाले तरी आम्हाला या धबधब्याचे नाव बदलायचे नाही. प्रसंगी आम्ही विरोध करू, असे आंबोली ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर आंबोली धबधबा हे नाव रहावे तसेच आंबोली ग्रामपंचायतीच्या ताब्यात हा धबधबा रहावा, अशी भूमिका चौकुळ ग्रामस्थांची आहे. त्यामुळे आता या भूमिकेत पालकमंत्री खासदार आणि प्रशासन कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

“संबंधित धबधबा हा पारपोली ग्रामस्थांच्या हद्दीत येत आहे. सद्यस्थितीत ते कर वसूलीचे काम करीत आहे; मात्र नाव बदलण्याबाबत आपल्याला काही माहीती नाही. तसा प्रस्ताव दिल्यास त्यासाठी ग्रामसभेची परवानगी असणे आवश्यक आहे.”
 - समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी.

“आंबोली धबधब्यासाठी कर घेताना दोन्ही गावांना तो देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयात घेण्यात आली होती. त्यावेळी सर्वानी अनुमोदन दिले होते; मात्र ही प्रक्रिया सुरू असताना त्या धबधब्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे आहे. आणि तसा प्रकार झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. त्याला विरोध करू, चौकुळ ग्रामस्थांनी त्यांना पाठीबा दिला आहे.”
- विलास गावडे, उपसरपंच आंबोली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com