खवय्यांच्या धावा आता गोड्या पाण्यातील मळ्याचे मासे आणि मुऱ्यांवर

अमित  गवळे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

रेसिपी 
या मुऱ्या धुवून घेवून तेल, मसाला, कांदा, आणि लसणावर झणझणीत सुकी बनविली जाते. तर काही जण घट्ट रसा बनवितात तर, काही वाटण टाकून रस्सा बनवितात. 

पाली : सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. अशा वेळी अनेक पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी कमी होऊ लागले आहे. या पाण्यात मळ्याचे मासे, मुऱ्या, खरब्या व वाम हे मासे हमखास सापडतात. प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे पकडतात. जिल्ह्यात सध्या बाजारात या माश्यांवर खवय्ये तुटून पडत आहेत.

ओढा, नाल्याच्या वाहत्या प्रवाहात छोटे जाळे, किंवा कापड लावले जाते. कधी कधी मच्छरदानी आणि साडी सुद्धा लावली जाते. त्यामध्ये मासे येवून अडकतात. तसेच शेतात किंवा खड्यात साठलेले पाणी सागाच्या पानांनी किंवा इतर साधनांनी कापड किंवा जुन्या साडीवर काढले जाते. आणि त्यानंतर त्यातील मासे पकडले जातात. या माश्यांमध्ये सर्वात जास्त मागणी मुर्यांना असते. हे मासे फक्त या मोसमातच सापडतात. आदिवासी आणि गळभोई लोक अगदी जिवंतच हे मासे विक्रीसाठी आणतात. अतिशय बारीक असलेल्या या मुर्या खरेदीसाठी लोकांच्या झुंबड उडतात. जावेद या तरुणाने सांगितले की कामानिमित्त दुबई येथे राहणारे नात्यातील एक व्यक्ती ख़ास मुऱ्या खाण्यासाठी इथे येतात. त्यांना मग मिळेल त्या किमतीमध्ये मुबलक प्रमाणात मुऱ्या घेवून जातो. असे हे मासे विकून आदिवासी व गळभोई समाजातील लोक आपला उदर्निवाह करतात. पण उन्हातान्हात कधी भर पावसात ओले चिंब होऊन हे मासे त्यांना पकडावे लागतात.

रेसिपी 
या मुऱ्या धुवून घेवून तेल, मसाला, कांदा, आणि लसणावर झणझणीत सुकी बनविली जाते. तर काही जण घट्ट रसा बनवितात तर, काही वाटण टाकून रस्सा बनवितात. 

किती ही मेहनत?
माश्यांची वाट बघत भर पावसात बनविले जेवण मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड आणि इंदापुर दरम्यान भुवन गावाजवळ एक आदिवासी वयोवृद्ध दाम्पत्य रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या ओढ्यातून मासे पकडतात. अनेक दिवस तिथे रस्ताच्या कडेला त्यांना बसलेले किंवा झोपलेले पाहिले होते. तीन चार दिवसांपूर्वी भर पावसात रस्त्याच्या कडेला त्या महिलेला भर पावसात छत्रीचा आधार घेत भाकरी भाजतांना पाहिले. खुप अप्रुप वाटल्याने तिथे जावून त्यांच्याशी संवाद साधला. पटकन त्या महिलेने दोन भाकऱ्या भाजल्या. त्या भाकऱ्या कुठेही कमी शिजलेल्या किंवा करपलेल्या नव्हत्या. हे दांपत्य बाजूच्याच रातवड गावात  राहते. ऊन-पावसात दिवसभर मासे मिळण्याची वाट बघतात. तीन दगड मांडून इथेच तात्पुरती चुल मांडून भाजी भाकर करतात. झोप आली की रस्त्याच्या कडेलाच विसावतात. तिथे उभ्या असलेल्या बाबांना विचारले मासे सापडले का? दोन दिवसांपासून हाती काहीच लागले नसल्याचे त्यांनी सांगितले. भाकरी सोबत कोरड्यास (भाजी/तोंडी लावायला) काय? विचारल्यावर खिशातून तीन भेंडी काढून दाखवत म्हणाले आहे ना भाजी! अशा प्रकारे मासे पकडण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते.