कोलगावची जागा युतीसाठी डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

सावंतवाडी - जिल्हास्तरावर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्याबाबत निर्णय झाला असला तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ कोणाला सोडावा, या विषयावरून शिवसेनेत गृहकलह होण्याची शक्‍यता आहे. त्याची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे.

सावंतवाडी - जिल्हास्तरावर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्याबाबत निर्णय झाला असला तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ कोणाला सोडावा, या विषयावरून शिवसेनेत गृहकलह होण्याची शक्‍यता आहे. त्याची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे.

आपण निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी मायकल डिसोझा यांनी केली आहे. भाजपकडून महेश सारंग यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. आयात उमेदवारांना संधी नको, अशी टीका करणाऱ्या खासदार राऊत यांनी डिसोझा यांची बाजू उचलून धरली आहे. केसरकर यांचीही जागा भाजपला सोडण्याची तयारी असल्याचे समजते. त्यामुळे हा प्रश्‍न दोघांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा बनल्याचे चित्र आहे. तालुक्‍यातील कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ युतीसाठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र आहे. मतदारसंघ खुल्या जागेसाठी राखीव आहे. या ठिकाणी शिवसेनेच्यावतीने कोलगावचे माजी सरपंच फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र मायकल डिसोझा इच्छुक आहेत. पक्षातून तुम्हालाच संधी दिली जाईल, बाहेरून आयात कार्यकर्त्यांना घेण्यात येणार नाही, असा इशारा खासदार तथा शिवसेना सचिव राऊत यांनी दिला होता.

मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर त्या ठिकाणी शिवसेनेत येण्यास इच्छुक असलेल्या पंचायत समिती उपसभापती सारंग यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडण्याच्या विचारात युतीचे पदाधिकारी आहेत. पर्यायाने श्री. सारंग यांना शिवसेनेत घेण्यास इच्छुक असलेल्या केसरकर यांनीही जागा भाजपला सोडण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या एका गुप्त बैठकीत तशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून कोलगाव जिल्हा परिषदमधील शिवसैनिक तथा डिसोझा यांचे कार्यकर्ते यांच्याशी जोरदार तूतू मैमै झाल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. पालिका निवडणुकीत सहन करावा लागलेला पराभव लक्षात घेता काही झाले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना- भाजप युती करूनच निवडणूक लढविण्यात यावी, अशी अपेक्षा वरिष्ठ नेत्यांची आहे. दुसरीकडे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यात याव्यात, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून झाली होती. परंतु दोन्ही पक्षांना ते मान्य नाही.

आपल्या मतदारसंघात शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी लुडबूड करू नये, असा दंडक केसरकर यांनी मातोश्रीवरून घातल्याचे समजते. त्यामुळे या सर्व राजकीय परिस्थितीत नेमका कोणाचा विजय होतो आणि कोणाला पराजय सहन करावा लागतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

दोघांच्या भांडणाचा काँग्रेसला लाभ
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात युतीत निर्माण झालेल्या या वादाचा फायदा घेण्यास काँग्रेसने सुरवात केली आहे. या ठिकाणी मैत्रीपूर्ण किंवा अपक्ष अशी लढत झाली तरी काँग्रेसच्याच उमेदवाराला पोषक स्थिती निर्माण होणार आहे. त्याचा फायदा घेण्याची मोर्चेबांधणी काँग्रेसने सुरू केली आहे. त्या ठिकाणी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत यांच्यासह आंबेगावचे माजी सरपंच वासुदेव परब यांचे नाव चर्चेत आहे.

Web Title: kolgav seat problem to alliance