वाढला टक्का, कुणाला धक्का!

वाढला टक्का, कुणाला धक्का!

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार पालिका आणि एका नगरपंचायतीसाठी उत्साहात आणि शांततेत आज सरासरी 73 टक्के मतदान झाले. एकूण 402 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. उद्या (ता. 28) मतमोजणी आहे. तीन तासांत म्हणजे दुपारी एकपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्‍यता आहे. सर्वाधिक मतदान खेडमध्ये सुमारे 78 टक्के, तर सर्वांत कमी मतदान रत्नागिरीत सुमारे 65 टक्के झाले. चिपळूणला सुमारे 72, दापोलीत सुमारे 73, राजापूर सुमारे 75 टक्के मतदान झाले. दरम्यान, या पाचही ठिकाणी तीन ते पाच टक्के मतदानात वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा कुणाला धक्का बसणार, याचीच चर्चा मतदानानंतर सुरू होती.

काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ खटके उडाले. राजापुरात मतदान यंत्र बंद पडले. दापोलीत मतदान यादीमधील गोंधळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. रत्नागिरीत एका प्रभागात शिवसैनिकांनी मतदान झाल्यानंतरच विजयाचे फटाके फोडले. रत्नागिरीत टी शर्ट घालून प्रचारार्थ फिरणाऱ्या काहींना पोलिसांनी रोखले, अशा घटना वगळता मतदान शांततेत झाले.

रत्नागिरीमध्ये आज मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिला. 67 केंद्रांवर सुमारे 65 टक्के मतदान झाले. काही प्रभागात उमेदवार, कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. सकाळी आणि संध्याकाळच्या टप्प्यात चांगले मतदान झाले. मुरुगवाडा प्रभाग अकरासाठीच्या पालिका शाळा क्रमांक 20 मतदान केंद्रावर शांततेचा भंग करणाऱ्या चारजणांवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते "चला बदल घडवू या' असा लोगो असलेले टी-शर्ट घालून मतदान केंद्रावर गेले. हा एक प्रचाराचा भाग असल्याने पोलिसांनी त्यांना हटकून त्यांच्यावर कारवाई केली. प्रभाग 14 मध्ये, तर मतदान झाल्यानंतर शिवसैनिकांनी मतमोजणी आधीच विजयाचे फटाके फोडले.

राजापुरात मतदानाला सुरवात होतानाच एका केंद्रावर मतदान यंत्र बंद पडले; परंतु निवडणूक विभागाने जादा मतदान यंत्राची सोय केली होती. त्यामुळे कोणताही गोंधळ न उडता तत्काळ यंत्र बदलण्यात आले. राजापूर शहरामध्ये 75 टक्के मतदान झाले. तेथेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दापोली नगरपंचायतीत
मतदारयादीतील दोषामुळे अनेक केंद्रावर मतदारांची नावे न आल्याने त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. येथे सुमारे 73 टक्के मतदान झाले. चिपळूण शहरामध्ये 72 टक्के मतदान झाले. या भागात सकाळी रमेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे काहीसे वातावरण तापले होते. खेड शहरामध्ये सर्वांत जास्त म्हणजे 78 टक्के मतदान झाले.

चारही नगराध्यक्षपदांचा फैसलाही आज
जिल्ह्यातील 291 मतदान केंद्रांवर रविवारी मतदान प्रक्रिया झाली. 4 नगराध्यक्षपदासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदाच्या 107 जागांसाठी 384 उमेदवार रिंगणात आहेत. आज या 402 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. उद्या (ता. 28) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. दुपारी एकपर्यंत निकाल बाहेर पडणार आहे.

मतदानाच्या आघाडीवर

  • चार पालिका, एका नगरपंचायतीसाठी मतदान
  • जिल्ह्यातील 402 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
  • शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीमध्ये चुरस
  • खेडमध्ये सर्वाधिक 73 टक्के मतदान
  • रत्नागिरीत सर्वाधिक कमी म्हणजे 65 टक्के मतदान
  • रत्नागिरी, चिपळुणात मतदानानंतर शिवसेनेने फोडले फटाके
  • दापोलीतील एका प्रभागात मतदारयादीत घोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com