बेडूक संवर्धन करणारा अवलिया; 12 वर्षे संवर्धनाचे काम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बेडूक हा शेतकऱ्याचा मित्र असून, प्रत्येक अवस्थेतला बेडूक परिसर स्वच्छ ठेवायला मदत करतो. तसेच, शेतात कीड नियंत्रणासाठीही त्याचे मोठे सहाय्य असते. म्हणून त्याला अपाय न करता संरक्षण दिले तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे. कारण निसर्गचक्रात बेडूक महत्त्वाची भूमिका बजावतात.
- मंगेश माणगावकर, निसर्गमित्र, होडावडा

सावंतवाडी : होडावडा येथील निसर्गमित्र मंगेश माणगावकर यांच्या बागेत बेडूक, किटक, पक्षी, फुलपाखरे यांचा मुक्त संचार पाहावयास मिळत आहे. माणगावकर गेली 12 वर्षे बेडूक संवर्धनाचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉगही त्यांच्या बागेत पाहावयास मिळत आहेत.

होडावडासारख्या छोट्या खेड्यात राहूनही बागेत किटक संवर्धन करण्याची किमया गावातील मंगेश माणगावकर यांनी केली. निसर्गाविषयी मोठी आवड असलेल्या श्री. माणगावकर यांनी आपल्या बागेत किटक व छोट्या प्राण्यांचे संवर्धन केले आहे. गेल्या वर्षीपासून आंबोलीत आढळणारे मलबार ग्लायडिंग फ्रॉगही त्यांच्या बागेत पाहावयास मिळत आहेत. गेल्या वर्षी पूर्ण हंगामात मलबार ग्लायडिंग फ्रॉगनी 14 फोमनेस्ट तयार केली होती; तर या हंगामात पहिल्या दोन महिन्यांत 34 फोमनेस्ट तयार केली आहेत. यामागे श्री. माणगावकर यांनी मोठी मेहनत घेतली आहे. यावरून हे बेडूक या बागेत चांगले स्थिरावल्याचे दिसून येत आहे.

बेडकासाठी बागेत चार तळी (पॉण्ड) तयार केली असूून, त्यात संरक्षण व खाद्य पुरविले जाते. यातील महिनाभरातील पिले मोठी होऊन नैसर्गिक अधिवासात जातात. या बागेत बुल फ्रॉग, बलूल फ्रॉग, बलुइंग फ्रॉग, कॉमन फ्रॉग, क्रिकेट फ्रॉग, स्कीटरिंग फ्रॉग, मलबार ग्लायडिंग फ्रॉग, टोड अशा विविध जाती पाहायवास मिळतात. आतापर्यंत पर्यावरणप्रेमी, अभ्यासू विद्यार्थी, प्राणी व वनस्पती शास्त्रज्ञांनी बागेला भेट दिली असून, ते बेडूक, पक्षी, किटक यांची छायाचित्रे काढून ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :