घुसमटलेली आंबोली

घुसमटलेली आंबोली

आंबोलीत वर्षभरातील सर्वात मोठा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे; मात्र या वर्षा पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊन हे स्थळ जागतिक नकाशावर नेण्याच्या केवळ वल्गना गेली अनेक वर्षे सुरू आहेत. त्या दिशेने अद्याप पाऊलच पडलेले नाही. काय होतंय नेमके, हे मांडण्याचा हा प्रयत्न.
 

आंबोलीचा नावलौकिक
आंबोली हे केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण कोकणातील पहिले पर्यटनस्थळ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इंग्रजांनी थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे महाबळेश्‍वर, माथेरानसोबतच येथेही पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा उभ्या केल्या होत्या. अर्थात त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांसाठी विरंगुळ्याचे स्थळ एवढाच या ठिकाणाचा हेतू होता. त्यांनी त्या काळात केलेले रस्ते, काही विकसित केलेली स्थळे, बसण्यासाठी उभारलेले बेंच यांच्या खुणा आजही येथे दिसतात. मधल्या काळात येथील पर्यटन विकासाचा मोठा गाजावाजा झाला. मात्र दुर्दैवाने आंबोली अपेक्षित विकासाचा टप्पा गाठूच शकली नाही.

वर्षा पर्यटनाची क्रेझ
थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे बारमाही पर्यटन अपेक्षित आहे. त्या दृष्टीने स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ यांचे प्रयत्नही असतात. मात्र वर्षा पर्यटन हा येथील सर्वात मोठा हंगाम. साधारण पावसाळा सुरू झाल्यानंतर श्रावण महिना सुरू होईपर्यंत दीड-दोन महिन्यांत येथे हजारो पर्यटक येतात. येथील पर्यटन व्यावसायिकांच्या दृष्टीने आर्थिक उलाढालीचा हाच महत्त्वाचा कालावधी मानला जातो. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने देणे हा येथील प्राधान्यक्रम म्हणायला हवा. असे असले तरी येथील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याच्या घोषणा राजकीय नेत्यांकडून वारंवार होत आहेत. त्यासाठी गोंडस योजनांची स्वप्नेही दाखविली जात आहेत. आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च होऊनही आंबोलीचा पर्यटन विकासाचा गाडा जागेवरच रुतलेला आहे.

महामार्गानंतरच...
आंबोली घाटातून जाणाऱ्या रेडी, बेळगाव या सहाशे साठ कोटींच्या महामार्गाची घोषणा सहा महिन्यांपूर्वी केंद्राने केली. यात या घाटरस्त्याच्या दुपदरीकरणाचे सर्वेक्षण झाले आहे. यामुळे रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. सार्वजनिक बांधकामकडून हा घाटरस्ता केंद्रीय रस्ते विभागाकडे या आधीच वर्ग झाला आहे. यात घाटाचे रुंदीकरण झाल्यास वर्षा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या धबधब्यांबाबत प्रश्‍न निर्माण होणार आहे. विकसित करायला घेतलेल्या पाचपैकी चार धबधबे रस्त्याच्या बाजूलाच आहेत. रुंदीकरणात ते कापावे लागण्याची शक्‍यता आहे.

मुख्य धबधब्याची अवस्था
आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी येणारा पर्यटक मुख्य धबधब्याला आवर्जून भेट देतो. येथे आत्तापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च झाला; मात्र त्यात धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य हरवून सिमेंटीकरण करण्यावरच भर दिला गेला. इतके होऊनही धबधब्याकडे जाताना अपघाताच्या घटना कायम आहेत. उंचावरून पाण्याबरोबर येणारे दगड रोखण्यासाठी साधी जाळीही बसविता आलेली नाही. नैसर्गिक सौंदर्य टिकवून या धबधब्याचा विकास करण्याची मागणी प्रत्यक्षात साकारलेली नाही. अशा स्थितीत आंबोली आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ कसे बनणार, हाच खरा प्रश्‍न आहे.

धबधब्यांचे दुखणे
वर्षा पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे आंबोली घाट रस्त्यावरील धबधबे होय. या घाटात धबधब्यांची मालिकाच आहे; मात्र सध्या त्यातल्या त्यात खुला असलेला एकच मुख्य धबधबा आहे. गेल्यावर्षी पर्यटन विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील धबधब्यांच्या विकासासाठी अडीच कोटी जाहीर झाले. त्यापैकी ६० लाख आंबोलीच्या धबधब्यासाठी जाहीर झाले; मात्र वर्षभरात फारसे काम झालेले नाही. सार्वजनिक बांधकामने दोन धबधब्यांच्या ठिकाणी तात्पुरत्या पायऱ्या उभारल्या होत्या. त्याही पहिल्या पावसात वाहून गेल्या आहेत. आणखी पाच धबधब्यांचा विकास करणार असे जाहीर झालेले आहे; मात्र त्या दिशेने काहीही झालेले नाही.

स्वच्छतागृहांचेही तीन-तेरा
कोणत्याही पर्यटनस्थळाच्या ठिकाणी चांगले रस्ते आणि सार्वजनिक स्वच्छतागृह या मूलभूत गरजा आहेत. मात्र ब्रिटिशांच्या काळापासून पर्यटनाचे स्वप्न पाहणाऱ्या आंबोलीत स्वच्छतागृहाचीही नीट व्यवस्था नाही. २०१३ मध्ये आमदार निधीतून जाहीर झालेले सार्वजनिक स्वच्छतागृह अद्याप पर्यटकांसाठी उपलब्ध झालेले नाही. सात वर्षांपूर्वी येथील पोलिस चौकीशेजारी मोठे स्वच्छतागृह बांधण्यात आले; मात्र उद्‌घाटनाअभावी ते बंदच आहे. येथील बस स्थानकातील असुविधांची यादी मोठीच आहे. पर्यटनस्थळांकडे जाणारा दिशादर्शक फलक, माहिती फलक याची तर वानवाच आहे.

निधी जातोय कुठे?
आंबोलीच्या पर्यटन विकासासाठी आतापर्यंत करोडो रुपये खर्च केले गेले. 
वन विभाग, बांधकाम विभाग यांच्या घोळात खर्च झालेला निधीही जातो कुठे, असा प्रश्‍न निर्माण होतो. 
उदाहरण द्यायचे तर ५५ लाख खर्चून नूतनीकरण केलेल्या आंबोली तलावाचा विचार करता येईल. हा तलाव दुरुस्तीनंतर जवळपास अस्तित्व हरवून बसला आहे. 
हिरण्यकेशी या स्थळाकडे जाणारा साकव धोकादायक बनला आहे. 
हिरण्यकेशीतील रस्ता खचून तेथे अपघातांची मालिकाच घडत आहे. 
येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही.
या आणि अशा कितीतरी प्रश्‍नांच्या कोंडीत आंबोलीचे पर्यटन घुसमटलेले आहे. आधी ही घुसमट सुटली तरच आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनण्याचे क्षितिज खुले होईल.

खर्चाचे बोलके आकडे
हर्बेरियम सेंटर - २० लाख (सन २००३)
बांधकाम विभागाने खर्च केलेली रक्कम- १० लाख
नांगरतास धबधबा पुलासाठी- १० लाख (२००५-०६)
जंगलसफारी रस्ता- ५ लाख (२००४-०५)
महादेवगड येथे पायऱ्या- ५ लाख (२००६-०७)
हिरण्यकेशी रस्ता- ४५ लाख, वाहनतळ- १५ लाख (२०११)
कावळेसाद रस्ता- ६० लाख (२०१०)
कावळेसाद पायऱ्या व रॅलिंग- २५ लाख (२०१२-१३)
महादेवगड रस्ता- २५ लाख (२०१३)
आंबोली मुख्य धबधब्याकडे चेंजिंग रूम- ४ लाख (२०१३)
मुख्य धबधब्याकडे पायऱ्या- १० लाख (२००६-०७)
पर्यटक संकुल- पावणेदोन कोटी (२००८-०९)
जकातवाडी सुशोभीकरण- ४५ लाख (२०१०)
शिरगावकर पॉईंट- १८ लाख ५४ हजार (२०१०)
वन उद्यानातील कामे अंदाजे- ३० ते ४० लाख
पूर्वीचा वस- १० लाख
हिरण्यकेशी पायऱ्या व स्ट्रीटलाईट- १५ लाख
पर्यटन संकुल - पावणेदोन कोटी (२००८)
शिरगावकर पॉईंट विकास - १८ लाख (२०१०)
वन उद्यान - जवळपास ६० लाख
व्हिविंग गॅलरी - ६ लाख (२०१५-२०१६)
धबधब्याकडील पायऱ्या - ६ लाख
धबधब्याकडील रेलिंग - दीड लाख
माऊली मंदिर भक्तनिवास - ३५ लाख
घाटातील वळणावर फूटपाथ - ४ लाख
कावळेसाद पाॅइंट गॅलरी आणि रेलिंग - ४५ लाख
महादेवगड रेलिंग आणि पायऱ्या - ३० लाख
हिरण्यकेशी सुशोभीकरण - २६ लाख (२००९)

या आहेत व्यथा
मुख्य धबधब्या-समोरील ब्रिटिशकालीन पूल कमकुवत असूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष
२९ लाख रुपये खर्चून उभारलेल्या बांबूच्या गजीबोची दैना
मुख्य धबधब्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांची दुरवस्था
पर्यटकांकडून पुरेशा सुविधा नसतानाही आकारल्या जाणाऱ्या करांविषयी नाराजी

हे आहे आंबोलीचे वैभव
सापांचे प्रकार    ३१
बेडकांचे प्रकार    २६
पक्ष्यांचे प्रकार    १६०
रानफुलांचे प्रकार    १४०
फुलपाखरांचे प्रकार    १६०
वनौषधींचे प्रकार    ७००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com