पाणी समस्येवर लोकवर्गणी व श्रमदानाची मात्रा

पाणी समस्येवर लोकवर्गणी व श्रमदानाची मात्रा

गुहागर - तालुक्‍यातील धोपावे गावाने खासगी पाणी योजना अत्यल्प खर्चात श्रमदानातून यशस्वी केली. पाणीटंचाई, महिलांचे कष्ट, विहिरीवरील वाद व त्यामुळे निर्माण होणारी दुही या साऱ्यावर मात करण्यासाठी नवतरुण विकास मंडळाने पुढाकार घेतला.

सुमारे १२ वर्षांपूर्वी धोपावे-सावंतवाडीतील जुन्या विहिरीचा वापर होत असे. फेब्रुवारीपासून टंचाई जाणवे. चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून विहिरीसाठी १ लाख ८५ हजार रुपये मिळाले. वाडीतील प्रत्येक कुटुंबाने ३ हजार रुपये वर्गणी काढून श्रमदान केले. सुमारे ७० फूट खोल विहीर खोदली.

ग्रामपंचायतीने वाडीसाठी दोन स्टॅंडपोस्ट दिले. दररोज केवळ दोन तास पाणी येत असे. २२ घरांसाठी ते अपुरे होते. एप्रिलनंतर पाणीपुरवठाही अनियमित होत असे. या वेळी विहिरीचा पर्याय होता; मात्र ते ५० फूट खोलवरून काढावे लागे. हे टाळण्यासाठी सावंतवाडी पाणी योजनेचा जन्म झाला. दापोली तालुक्‍यातील असोंडमधील विश्वास गोंधळेकर आणि देव्हाऱ्यातील संजय भोसले यांना मार्गदर्शनासाठी बोलावले. योजनेचा आराखडा बनवला. प्रत्येक कुटुंबाने ५ हजार रुपये वर्गणी गोळा केली. खासगी योजना पूर्ण होईल असा विश्‍वास भोसले व गोंधळेकर यांनी दिला. वाडीतील उच्चशिक्षित तरुण पुढे आले. वर्गणीतून १ लाख १० हजार जमले. 

वाडीखात्यातून ५० हजार रुपये घेतले. उर्वरित १६ हजार ग्रामस्थांनीच जमा केले. चार तरुण अभियंते, प्लबिंगची कामे करणारे वाडीतील तरुण यांच्या मदतीने ग्रामस्थांनी श्रमदानातून योजना उभारली. कमी खर्चात उत्तम दर्जाचे साहित्य आणले. अपेक्षित वर्गणीसाठी काहीवेळा ताण पडला; परंतु ग्रामस्थांनी तीन आठवड्यात पावणेदोन लाखात योजना पूर्ण केली.

उच्चशिक्षित चाकरमानी
योजनेचे नियोजन धोपावेतील सध्या परगावी असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील केमिकल इंजिनिअर संजय रामचंद्र सावंत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (पुणे) काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय अर्जुन सावंत, जयहिंद इंडस्ट्रीजमधील मेकॅनिकल इंजिनिअर अमित अर्जुन सावंत आणि पुण्यातील इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर अरुण जयराम सावंत या तरुणांनी केले.

जलसंवर्धनही करणार
विहिरीचे पाणी आटू नये, म्हणून जलसंवर्धनही करण्यात येणार आहे. विहिरीच्या परिसरात छोटे शोषखड्डे काढून जलपुनर्भरण करण्यात येणार आहे. डोंगरमाथ्यापासून विहिरीपर्यंत काही ठिकाणे चरही खणण्यात येणार आहेत. तसेच छोट्या नाल्यावर श्रमदानातून गणपतीत बंधारे घालण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com