बांद्यात दारू वाहतुकीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

बांदा - ट्रकमधून बीडच्या दिशेने सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीचा येथील पोलिसांनी पर्दाफाश केला. सुमारे ३ लाखांच्या दारूसह आठ लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल (ता. १०) रात्री पावणेअकराच्या सुमारास येथील तपासणी नाक्‍यावर करण्यात आली.

बांदा - ट्रकमधून बीडच्या दिशेने सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीचा येथील पोलिसांनी पर्दाफाश केला. सुमारे ३ लाखांच्या दारूसह आठ लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल (ता. १०) रात्री पावणेअकराच्या सुमारास येथील तपासणी नाक्‍यावर करण्यात आली.

गोव्याहून मोठ्या दारू साठ्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याची टीप येथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल रात्री नऊ वाजल्यापासून सहायक पोलिस निरीक्षक कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी नाक्‍यावर सापळा रचण्यात आला. येथून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. पावणेअकराच्या दरम्यान लाल रंगाचा ट्रक (एम.एच.०३/ एन ०८१०) तपासणी नाक्‍याकडे आला.  पोलिसांनी गाडी थांबवून हौद्याची व केबिनची तपासणी केली. ट्रकच्या हौद्यात काळ्या ताडपत्रीखाली काहीतरी लपविले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आत पाहणी केली असता गोवा बनावटीच्या दारुंनी भरलेले खोके आढळले. यात ऑफिसर चॉईसचे २५, मॅकडॉवेलचे १५, मॅकडॉवेल नं.१ चे ७ खोके आढळले. या सगळ्याची किमत सुमारे ३ लाख इतकी आहे.

पोलिसांनी या प्रकरणी श्‍याम अश्रुबा गीते (वय २९, रा. बनेवाडी, ता. केज, जि. बीड) आणि बाबुराव नामदेव शारुक (वय २६, रा. खाडयेवाडी, ता. केज, जि. बीड) या संशयितांना ताब्यात घेतले. ही दारू आपण बीडकडे घेऊन जात असल्याचे संशयिताने सांगितले. पोलिसांनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई पोलिस नाईक दत्तात्रय देसाई, श्री. रेवंडकर, श्री. गावकर, श्री. पास्ते, श्री. नाईक यांनी केली.

बीडपर्यंत वाहतूक
या प्रकरणी पकडलेल्या संशयितांनी दारू बीडला नेली जात असल्याचे सांगितले. बीडपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जिल्ह्यांच्या हद्दी पार कराव्या लागतात. तरीही जवळपास ट्रक भरुन दारू नेली जात होती. यामुळे या दारू वाहतुकीमध्ये अनेकांचे हितसंबंध अडकले असण्याची शक्‍यता आहे.

पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
नवे पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहिम उघडली आहे. असे असले तरी  बेकायदा दारू वाहतूक मात्र सुरुच आहे. काही दिवसापूर्वी नवी मुंबईजवळ दारूसाठा जप्त करण्यात आला होता. तोही गोव्यातूनच गेला होता. आता पुन्हा इतक्‍या मोठ्या प्रमाणात दारूसाठा नेला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दारू वाहतुकीविरोधात पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स