सेना-भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे

एकनाथ पवार
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

वैभववाडी -काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कथीत भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यांच्या प्रवेशासोबत जिल्ह्यातील शिवसेना भाजपमधील उरलेसुरले मित्रत्वाचे संबधही संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेना भाजपमधील राजकीय संघर्ष अटळ मानला जात आहे.

वैभववाडी -काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कथीत भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यांच्या प्रवेशासोबत जिल्ह्यातील शिवसेना भाजपमधील उरलेसुरले मित्रत्वाचे संबधही संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेना भाजपमधील राजकीय संघर्ष अटळ मानला जात आहे.

गेल्या काही महिन्यापासून काँग्रेस नेते राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे; परंतु मागील आठवडाभरात या चर्चेने जोर धरला आहे. राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर राणेंचा प्रवेश निश्‍चित होणार असल्याचे भाजप कार्यकर्त्याकडून सांगितले जात आहे. राणेंच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाचा सर्वाधिक फटका पारंपरिक मित्र असलेल्या शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे. यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून श्री. राणे आणि भाजपवर बोचरी टीका सध्या सुरू आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना पक्षात घेण्याची दुर्बुध्दी भाजपाला सुचली आहे. राणे म्हणजे ‘चायना माल’ त्यांची गॅरंटी नाही, अशी टीका करीत राणेंची आणि राणेंना पक्षात स्‍वीकारणाऱ्या भाजपची खिल्ली उडवली आहे. तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंन मंत्रिमंडळात घेताना त्यांचे रेकॉर्ड भाजपने तपासावे, असा सल्ला दिला. त्यामुळे राणेंचा भाजप प्रवेश जिल्ह्यात शिवसेनेला परवडणारा नाही हेच त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

राज्यात शिवसेना-भाजपची युती आहे; परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी काडीमोड घेत स्वबळावर निवडणुका लढविल्या. त्यानंतर या दोन्ही पक्षामध्ये टोकाचे वाद निर्माण झाले. मुंबई, ठाणे महानगरपालिकांसह आताच झालेल्या मीरा भाईंदर निवडणुकीत एकमेकावर टीका करण्याची एकही संधी वरिष्ठ नेते सोडताना दिसले नाहीत. यामुळे वरिष्ठ पातळीवर पूर्वीसारखे सौजन्याचे वातावरण राहिलेले नाही; मात्र तशी स्थिती जिल्ह्यात पाहायला मिळत नाही. येथे मात्र कायमच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर एकमेकांशी हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला. जिल्‍ह्यात शिवसेनेचा शत्रू नंबर एक राणेच आहेत. यामुळे त्यांना शह देण्यासाठी त्यांनी कायमच भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. काही नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही पक्षांना स्वबळाची खुमखुमी नडली. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यस्तरावरून युती न करण्याचे स्पष्ट संकेत असताना स्थानिक नेत्यांनी काही मतदारसंघामध्ये छुपी युती केली. त्याचा त्यांना फायदा देखील झाला. यामुळे राज्यस्तरावर ज्या पध्दतीने शिवसेना भाजपमध्ये वाद आहेत तितके टोकाचे वाद जिल्ह्यात या दोन्ही पक्षामध्ये कधीच नव्हते. राणेंना नामोहरण करण्याच्या उद्देशाने हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात एकत्र येतात हे अनेकदा स्पष्ट आहे; मात्र राणे आता भाजपमध्ये निश्‍चितपणे प्रवेश करणार असे बोलले जात आहे. त्यांच्या प्रवेशासोबत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार हे नक्कीच आहे. आतापर्यंतचे पांरपरिक राजकीय मित्र एकमेकांचे शत्रू होणार आहेत. यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्येच राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. राणेंचा भाजप प्रवेश शिवसेनेकरीता अनेक कारणांनी परवडणारा नाही. सत्तेपासून दूर असलेले राणे हे सत्तेत आले तर जिल्ह्याची सूत्रे पुन्हा त्यांच्या हाती जातील, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. सत्तेतला मोठा पक्ष भाजप असल्यामुळे शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांची कुचंबणा होऊ शकते. यामुळे शिवसेनेला राणेंचा भाजप प्रवेश नकोसा आहे. त्यातूनच खासदार राऊत यांनी भाजप आणि राणेंवर टोकाची टीका केली. भाजपला दुर्बुध्दी सुचली आहे, राणे म्हणजे चायना माल आहे. टिकण्याची गॅंरटी नाही, अशी खोचक टिप्पणी सुध्दा त्यांनी केली. त्यांच्या पाठोपाठ पालकमंत्री श्री. केसरकर यांनी देखील राणेंचे रेकॉर्ड तपासून प्रवेश द्यावा, असा सबुरीचा सल्ला भाजपला दिला आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकाच वेळी टीका केली आहे. त्यांच्या टिकेतूनच भविष्यातील राजकीय संघर्षाची चाहुल लागत आहे.

स्थानिक भाजपमधूनही सुप्त विरोध
शिवसेना भाजपमधील हा राजकीय संघर्ष निवडणूक काळापुरता मर्यादित असणार नाही तर जिल्ह्यात होणाऱ्या असंख्य विकासकामावरून श्रेयवादाची लढाईसुद्धा होण्याची शक्‍यता आहे. ज्याप्रमाणे राणेंचा भाजप प्रवेश शिवसेनेला अमान्य आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील भाजप नेत्यांचा कानोसा घेतला तर त्यांना देखील राणे नको असल्याचे कार्यकर्त्याकडून सांगितले जाते; मात्र राणेंचा प्रवेश हा वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याने कुणीही खुलेपणाने विरोध करताना दिसत नाही. त्यातच काँग्रेसमधुन खुद्द राणेंशी फारकत घेऊन भाजपवासी झालेल्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
राजकीय समिकरणे पुन्हा बदलणार

काही महिन्यापूर्वी भाजपत प्रवेश केलेले अनेक पदाधिकारी राणेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील काही राजकीय पक्षांमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरतेचे वातावरण दिसून येईल. यामुळे सर्वाचे लक्ष राणेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाकडे लागून राहिले आहे.