साडेचार लाखांचा रस्ता पूर्ण फक्त कागदावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

चिपळूण - तालुक्‍यातील वीर टेकडेवाडी येथील रस्त्याचे प्रथमच मजबुतीकरण झाले; मात्र योग्य प्रकारे सपाटीकरण न झाल्याने ग्रामस्थ व शाळकरी मुलांना रस्त्यावरून धड चालताही येत नाही. या रस्त्यासाठी सुमारे साडेचार लाखांचा खर्च करून तो पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम अपूर्ण आहे. ग्रामस्थांना योग्य रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वीर टेकडेवाडी व करमरेवाडी येथील ग्रामस्थांनी उपसभापती शरद शिगवण यांच्याकडे  केली.

टेकडेवाडी व करमरेवाडीतील ग्रामस्थ उपसभापती शरद शिगवण यांच्याशी चर्चा करताना म्हणाले, की अतिशय दुर्गम भाग असलेल्या वीर येथील टेकडेवाडीत दोन वर्षांपूर्वी जेसीबीच्या साह्याने कच्चा रस्ता तयार केला. पहिल्या टप्प्यात पंचायत समिती सेस फंडातून दोन लाखांचा खर्च केला. मागील वर्षी उर्वरित कच्चा रस्ता तयार केला.  त्यावर सेस फंडातून अडीच लाखाचा खर्च दाखवला आहे. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने अद्याप संबंधित ठेकेदारास बिल अदा झालेले नाही. सुमारे ५०० मीटरचा कच्चा रस्ता झाला. या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानही केले. दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे कामही जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पूर्ण झाल्याचे दाखवले. मात्र, प्रत्यक्षात कामकाज झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करण्यापूर्वी रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे. तसेच वाडीतील उर्वरित विकासकामांसाठी निधी द्यावा. 

याबाबत उपसभापती शिगवण म्हणाले की, विकास कामांना निधी मिळण्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची ग्रामस्थांसमवेत भेट घेऊ. ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. त्यासाठी पंचायत समितीमधील सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ४) बैठक घेण्याचे निश्‍चित केले.त्वरित विभागप्रमुखांना बैठकीचे पत्रही दिले. वाडीअंतर्गत रस्त्याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन उपसभापतींनी दिले. यावेळी वीर टेकडेवाडी व करमरेवाडीतील विजय बेंडल, पांडुरंग दुर्गवळी, देवू दुर्गवळी, बाबाजी दुर्गवळी, उदय दुर्गवळी, अनिल दुर्गवळी, रघुनाथ दुर्गवळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.