सामूहिक रजेमुळे पालिकांत शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

चिपळूण - पालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनाला जिल्ह्यामध्ये सर्वत्र १०० टक्के प्रतिसाद लाभला. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता उर्वरित खात्यांचे कर्मचारी हजर नसल्याने पालिकांमध्ये शुकशुकाट होता. शहरातील अनेक ठिकाणी कचरा उचलला गेला नाही. या आंदोलनानंतर आजपासून काळ्या फिती लावून आणि त्यानंतरचे पाऊल बेमुदत आंदोलनाचे असणार आहे.

या आंदोलनाला चिपळुणात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सफाई कामगारही रजेवर गेल्यामुळे आज शहरातील कचरा उचलला गेला नाही.  सकाळी नेहमीप्रमाणे पालिकेची इमारत उघडण्यात आली; मात्र खातेप्रमुखांसह सर्वच विभागांचे कर्मचारी रजेवर होते. त्यामुळे एक खिडकी, बांधकाम, आरोग्यसह इतर विभागांतील प्रश्‍न घेऊन आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. अग्निशामक दल आणि पाणीपुरवठा विभाग अत्यावश्‍यक सेवेत मोडत असल्यामुळे कर्मचारी संघटनेतर्फे या दोन विभागांतील कर्मचाऱ्यांना आंदोलनातून वगळले होते. त्यामुळे पाणीपुरवठा आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी व अधिकारी दिवसभर पालिकेत होते. सफाई कामगारही रजेवर गेल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. सकाळी दहा वाजता पालिकेतील सर्वच कामगार व अधिकारी पालिकेच्या आवारात जमले होते. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे यांनी मागण्यांचे वाचन केले. याचदरम्यान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, शिवसेनेचे गटनेते शशिकांत मोदी, काँग्रेसचे गटनेते शौका काद्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सौ. वर्षा जागुष्टे पालिकेच्या आवारात दाखल झाले. कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या रजा आंदोलनाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. संघटनेच्या मागण्यांबाबत नगरविकास खात्याने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविल्याचे नगराध्यक्ष सौ. खेराडे यांनी सांगितले.

सामूहिक रजा आंदोलनानंतर पालिका कर्मचारी आजपासून (ता. १०) काळ्या फिती लावून काम करणार आहेत. १५ ऑगस्टला लोकप्रतिनिधींना आंदोलनाचे निवेदन देऊ. २१ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले जाईल. तत्पूर्वी, शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.
- अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी-चिपळूण पालिका

Web Title: konkan news chiplun municipal