चिपळुणात जनजीवन विस्कळीत

चिपळुणात जनजीवन विस्कळीत

चिपळूण - तालुक्‍यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख नाका येथील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती, तर कुंभार्ली घाटात दरड, तर काही ठिकाणी झाडेही कोसळली. 

२४ तासात विक्रमी १९६ मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभर पाऊस असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. सायंकाळी पावसाचा जोर कायम राहिल्याने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात अडथळे आले. काही सार्वजनिक मंडळांनी पावसामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केले. शहरातून वाहणाऱ्या शिवनदीने धोक्‍याची पातळी ओलांडली होती. वाशिष्ठी नदीच्या पात्रातील पाणी ५ मीटरपर्यंत वाढले, तर शहरात भोंगा वाजवून धोक्‍याचा इशारा दिला जातो. नदी पात्रातील पाण्याची पातळी ४.७० मीटरने वाढली होती. शहराच्या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ते पाणी ओसरले.

महामार्गावर बहादूरशेख नाका येथे ब्रििटशकालीन पूल आहे. सद्य:स्थितीत तो धोकादायक बनला आहे. मुसळधार पावसाला सुरवात झाल्यानंतर पोलिसांनी वाहतूक बंद केली. त्यामुळे चिपळूण आणि कळंबस्तेच्या बाजूने लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवजड वाहने खेर्डीमध्ये थांबविण्यात आली. 

खेडमार्गे मुंबईकडे जाणारी वाहने कराडच्या दिशेने सोडण्यात आली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मध्यरात्री पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. कुंभार्ली घाटात सायंकाळी साडेसात वाजता काही ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता लवेश तांबे, शाखा अभियंता विशाल नलावडे यांनी घटनास्थळी जावून जेसीबीच्या साहाय्याने दरडी हटविल्या. महामार्गावर धामणदेवी आणि चिपळूण शहरात ओझरवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने कटरच्या साहाय्याने झाडाचे तुकडे करून ते बाजूला केले. आज दिवसभर पावसाने विश्रांती  घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com