शिरसिंगे गावाने दिला जलस्वावलंबनाचा वस्तुपाठ

शिरसिंगे गावाने दिला जलस्वावलंबनाचा वस्तुपाठ

दाभोळ -  दापोली तालुक्‍यातील जेमतेम ५०० लोकसंख्या असलेल्या शिरसिंगे गावातील ग्रामस्थांनी ‘जलस्वावलंबनाचा’ वस्तुपाठ संपूर्ण कोकणला दिला. तो इतर गावांसाठीही आदर्शवत ठरणारा आहे. गावाला अव्याहत पाणीपुरवठा व्हावा व जलसाठा टिकून राहावा, यासाठी ग्रामस्थांनी कोटेश्वरी (कोडजाई) नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. समस्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदानाने उत्खनन करून नदीपात्रातील गाळ काढला. आता बहुतांश पात्र गाळमुक्त झाले आहे.

शिरसिंगे गावच्या सरपंच श्रीमती पड्याळ, सदस्य स्वप्नील जाधव, या नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमात पुढाकार घेऊन त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व अन्य साधने यांची व्यवस्था करणारे व शिरसिंगेमधील ‘जनक जांभा नगरी’ या कोकणातील पाहिल्या हरित ग्रामनगरीचे संचालक संदीप व तुषार जोशी उपस्थित होते. या नदीपात्रातील गाळ काढणे व बंधारा बांधणीच्या प्रकल्पाचे नियोजन गेले वर्षभर सुरू होते. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांच्या देशभरातील सुरू असलेल्या जल अभियानातून प्रेरणा  घेऊन शिरसिंगेवासीयांनी हा उपक्रम करण्याचे ठरविले. यासाठी संदीप व तुषार जोशी यांच्या पुढाकाराने या कामासाठी प्रसिद्ध जलव्यवस्थापन तज्ज्ञ संदीप अध्यापक यांना पाचारण करण्यात आले. अध्यापक यांच्या सल्ल्यानुसार सरपंच पड्याळ व सदस्य स्वप्नील जाधव व ग्रामस्थ यांनी नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प सोडला.

गेल्यावर्षी नदीच्या २ कि.मी. पात्राचे उत्खनन करण्याचे निश्‍चित झाल्यावर जेसीबी यंत्रणा लावून नदीत खोदाई करण्यात आली. त्यामुळे नदी प्रवाहित झाली. श्रमदानाने उर्वरित कामाची आखणी करण्यात आली. गावकऱ्यांनी श्रमदानातून ४०० मीटर नदी परिसरातील गाळ काढला. नदीपात्र रुंदी तसेच खोल करण्यात आले. पावसाळ्याच्या तोंडावर लोकसहभागातून बंधारा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. या श्रमदानात गावातील सुमारे १५० ग्रामस्थ सहभागी झाले होते. शिरसिंगेच्या सरपंच पड्याळ यांनी ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचे व एकूणच अभियानाचे कौतुक केले असून भविष्यात हे गाव स्वयंपूर्ण गाव बनविण्याचा संकल्प या वेळी बोलताना व्यक्‍त केला. 

समृद्ध कोकण व महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ‘जलचेतना चषका’साठी शिरसिंगे गाव आपली प्रवेशिका सादर करणार आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांनीही शिरसिंगेवासीयांना जनजागृती अभियानासाठी शुभेच्छा दिल्या. 

श्रमदानातून पुन्हा प्रवाहित झालेली नदी गावाला जलस्वावलंबी बनवेल व स्वयंपूर्ण ग्रामविकासासाठी संधी उपलब्ध करेल. पुढील वर्षी या नदीवर सिमेंटचा बंधारा बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने तडीस नेऊ.
- संदीप जोशी, संचालक, जनक जांभा नगरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com