माॅन्सूनपूर्व पावसाचा संगमेश्‍वरला तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

देवरूख - सलग तीन दिवस कोसळणाऱ्या माॅन्सूनपूर्व पावसाने संगमेश्‍वर तालुक्‍याला चांगलाच तडाखा दिला आहे. तालुक्‍यातील विविध भागांत घरे आणि इमारती कोसळून आतापर्यंत ३ लाख ५५ हजार ५८० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. घरावर वीज पडल्याने एक जण जखमी होण्याचा प्रकार घडला आहे.

देवरूख - सलग तीन दिवस कोसळणाऱ्या माॅन्सूनपूर्व पावसाने संगमेश्‍वर तालुक्‍याला चांगलाच तडाखा दिला आहे. तालुक्‍यातील विविध भागांत घरे आणि इमारती कोसळून आतापर्यंत ३ लाख ५५ हजार ५८० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. घरावर वीज पडल्याने एक जण जखमी होण्याचा प्रकार घडला आहे.

मुसळधार पावसाने तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गावर बावनदी ते तळेकांटे दरम्यान दरड कोसळण्याची घटना काल घडली. यामुळे महामार्गावरची वाहतूक दोन तास बंद होती. या घटनेमुळे यावर्षीही महामार्गावरील दरडी धोकादायक ठरण्याची दाट शक्‍यता आहे. तळेकांटे येथील एकनाथ बने यांच्या घरावर वीज पडून ते जखमी झाले. त्यांच्या घरातील इलेिक्‍ट्रकल सामान जळून खाक झाल्याने त्यांचे १ लाख ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. माॅन्सूनपूर्व पावसाने रविवारपासून तालुक्‍यात धुमशान सुरू केले असून, बुधवारपर्यंत तालुक्‍यात ५०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्‍यातील मुचरी, कोंडकदमराव, दाभोळे गावातही पावसाने मोठे नुकसान झाले आहे. मुचरी येथील संतोष जाधव यांच्या घरावर माड कोसळल्याने त्यांचे  ७ हजार १०० रुपयांचे, किशोर जाधव यांचे ४२ हजार ३४० रुपये, मधुकर जाधव यांच्या घराचे ४९ हजार ६४०, दाभोळे येथील सुनीता बेलकर यांचे १ हजार ३०० रुपये, लक्ष्मण कोलापटे यांचे २ हजार १०० रुपये, चंद्रकांत डाऊल यांचे २ हजार ५०० रुपये, कोंडकदमराव येथील शिवाजी कदम यांच्या घराचे ८ हजार ४०० रुपये, तळेकांटेतील कांचन बने यांच्या घराचे १२ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले. तसेच जिल्हा परिषद शाळा तुळसणी नं. २ ची कपांऊड वॉल, कमान कोसळून येथे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

मुसळधार पावसामुळे देवरूख- संगमेश्‍वर मार्गावर काल वृक्ष कोसळला. प्रवासी आणि ग्रामस्थांनी तत्काळ वृक्ष बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. देवरूख बागवाडीतही एका ठिकाणी वृक्ष उन्मळून पडला, तर करंबेळे ते पाटी या भागातील रस्त्याशेजारचे अनेक वृक्ष काल जमिनदोस्त झाले.