रुग्णांची संख्या वाढती, डॉक्‍टरांची घटती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

दाभोळ - दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे रुग्णालय सध्या ‘व्हेंटिलेटर’वर असून स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत काही करत नाहीत, त्यामुळे जनतेत नाराजी आहे. 

दाभोळ - दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे रुग्णालय सध्या ‘व्हेंटिलेटर’वर असून स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत काही करत नाहीत, त्यामुळे जनतेत नाराजी आहे. 

वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. तुषार भागवत असताना रुग्णांना उत्तम सेवा मिळत होती. डॉ. भागवत यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालय सोडल्यानंतर या रुग्णालयाचा कारभार पूर्णतः कोलमडला. दापोली तालुक्‍यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तालुक्‍यातील ग्रामीण भागाबरोबरच खेड व मंडणगड तालुक्‍यातील रुग्णही दापोली उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी येतात. डॉ. तुषार भागवत (सर्जन), डॉ. सुयोग भागवत (फिजिशियन), डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, डॉ. सुहास मुळे, डॉ. रोशन उतेकर (कंत्राटी अस्थिरोगतज्ज्ञ) या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय सोडले. भूलतज्ञ रामचंद्र लवटे यांची बदली झाली. आता तेथे डॉ. बालाजी सगरे व डॉ. महेश भागवत  असे दोनच वैद्यकीय अधिकारी आहेत. रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रत्नागिरी अथवा दापोलीतील खासगी रुग्णालयात जावे लागते. उपजिल्हा रुग्णालयाला मिळत नसलेले भूलतज्ञ खासगी दवाखान्यात उपलब्ध होतात. रुग्णालयात रुग्ण अथवा रुग्णांचे नातेवाईक यांना कर्मचाऱ्यांकडून सौजन्यपूर्ण सेवा मिळत नाहीच. अनेकवेळा वैद्यकीय अधिकारी वेळेत  उपस्थित राहात नाहीत.

दापोलीच्या या उपजिल्हा रुग्णालयाला  वैद्यकीय अधिकारी मिळण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला ठेवून सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणला पाहिजे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात. 

येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन रुग्णालयाबाबत सूचना दिल्या. बांधकाम विभागाशी याबाबत बोलणीही केली. मात्र वर्ष उलटूनही रुग्णालयाची डागडुजी झाली नाही. रुग्णालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य आहे. शेजारील जुनी इमारत मोडकळीस आली आहे. 

रुग्णालयाचा विस्तार रखडला
या रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या पाहून राज्यशासनाने ५० खाटा असणाऱ्या या रुग्णालयाची श्रेणीवाढ करून या रुग्णालयाला १०० खाटांची परवानगी ३ वर्षापूर्वीच दिली. वाढीव बांधकामाचे नकाशे, खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही दिले नाहीत. त्यामुळे विस्तार रखडला.