वीजवाहिनी पडून शेतकरी ठार

वीजवाहिनी पडून शेतकरी ठार

वैभववाडी - अंगावर वीजवाहिनी कोसळून कोकिसरे-बांधवाडी येथील शेतकरी विलास सोनू जड्यार (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी दोनच्या सुमारास वीजवाहिन्यांवर झाड कोसळल्यामुळे ही घटना घडली. नैसर्गिक आपत्तीचा या वर्षातील पहिला प्रकार आहे. या प्रकारानंतर महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. रुग्णालयात महावितरणचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

तालुक्‍यात भातलावणीचा हंगाम सुरू आहे. दुपारी दोनच्या सुमारास जड्यार शेतात निघाले होते. कोकिसरे बांधवाडी येथील अंतर्गत रस्त्यावरून जात असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळाने विजेच्या खांबाजवळील झाड वाहिन्यांवर कोसळले. त्या धक्‍क्‍याने वाहिन्या तुटून पडल्या. वीजप्रवाह सुरू असलेल्या या वाहिन्या शेतात जात असलेल्या जड्यार यांच्या अंगावर कोसळल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

जड्यार रस्त्यातच कोसळलेले पाहून आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. जड्यार यांना तत्काळ खासगी दवाखान्यात नेण्यात आले; परंतु तेथील डॉक्‍टरांनी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी जड्यार मृत असल्याचे सांगितले.

जड्यार यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कोकिसरे बांधवाडीसह गावातील अनेक लोक रुग्णालयात दाखल झाले. माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, सचिन म्हापुरसकर, राजा गडकर, श्रीराम शिंगरे यांच्यासह कित्येक ग्रामस्थ रुग्णालयात आले. ग्रामस्थ संतप्त होते. महावितरणच्या कारभाराचा हा बळी आहे. त्यामुळे अधिकारी जापर्यंत रुग्णालयात येत नाहीत, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू नये, अशी सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. जयेंद्र रावराणे यांनी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची भूमिका मोबाईलवरूनच सांगितली. बांधवाडीतील वाहिन्यांची दुरुस्ती करण्यापूर्वी रुग्णालयात यावे, असे त्यांनी ठणकावले. अवघ्या काही मिनिटांत महावितरणचे येथील सहायक अभियंता एस. बी. लोथे रुग्णालयात आले. श्री. रावराणे यांनी जड्यार यांचा बळी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे गेल्याचा आरोप केला. महावितरण शेतकऱ्यांना काय देणार ते सांगा आणि ते लेखी स्वरूपात द्या, असे श्री. लोथे यांना बजावले. यावेळी लोथे यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मृताच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून २० हजार देणार असल्याचे सांगितले. याशिवाय वीज निरीक्षक यांचा अभिप्राय आणि अन्य गोष्टींची पूर्तता केल्यानंतर ३ लाख ८० हजार रुपये देण्याची तरतूद आहे, असे सांगितले. तसे लेखी पत्र ग्रामस्थांनी त्यांच्याकडे मागितले. अर्ध्या तासानंतर श्री. लोथे यांनी तातडीने वीस हजार रुपये आणि पत्र नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

या सर्व प्रकारानंतर ग्रामस्थांनी मृतदेहाचे विच्छेदन करण्यास अनुमती दर्शवली. विलास जड्यार यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, चार भाऊ असा परिवार आहे.

चार लाखांच्या मदतीची तरतूद
वीजवाहिनी अंगावर पडून मृत्यू किंवा तत्सम कारणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास महावितरणकडून चार लाख रुपयांची मदत मृताच्या नातेवाईकांना देण्याची तरतूद आहे. तातडीची मदत रोखीने दिली जाते; परंतु उर्वरित रक्कम कागदपत्रांची पूर्तता, वीज निरीक्षकांच्या अभिप्रायानंतर दिली जाते. त्यानुसार जड्यार कुटुंबाला आज तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपये देण्यात आले.

सावंतवाडीतील दुर्घटनेची आठवण
जिल्ह्यात वीजवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्या न बदलल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. दोन वर्षांपूर्वी सावंतवाडीतही वीजवाहिनी तुटून दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर हा प्रश्‍न अधिक ठळक बनला होता; मात्र महावितरणच्या कारभारात फारशी सुधारणा न झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com