माहितीअभावी चौपदरीकरण विरोधाला बळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

गुहागर - गुहागर-विजापूर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने विरोधाला बळ मिळत आहे. एन्‍रॉनच्या काळात या मार्गाचे दुपदरीकरण झाले. तेव्हा चौपदरीकरण ध्यानी घेऊन भूसंपादन झाल्याने पुरेशी जागा सरकारकडे आहे, असा अर्थ होतो. तसे असल्यास संबंधित खाती याविषयी अज्ञान प्रकट करीत आहेत की मूग गिळून, असा प्रश्‍न आहे. याला विरोध करणारे पुढारी याबाबत माहिती नसलेले आहेत, यावर कोणाचा विश्‍वास नाही. 

गुहागर - गुहागर-विजापूर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने विरोधाला बळ मिळत आहे. एन्‍रॉनच्या काळात या मार्गाचे दुपदरीकरण झाले. तेव्हा चौपदरीकरण ध्यानी घेऊन भूसंपादन झाल्याने पुरेशी जागा सरकारकडे आहे, असा अर्थ होतो. तसे असल्यास संबंधित खाती याविषयी अज्ञान प्रकट करीत आहेत की मूग गिळून, असा प्रश्‍न आहे. याला विरोध करणारे पुढारी याबाबत माहिती नसलेले आहेत, यावर कोणाचा विश्‍वास नाही. 

गुहागर विजापूर हा मार्ग सर्वात जुना आहे. अंजनवेलचा गोपाळगड, दाभोळ बंदर आदिलशाहीच्या ताब्यात असताना यामार्गे वाहतूक होत असे. पुढे इंग्रजांनी सडक बांधली. काळाच्या ओघात मुंबई उद्योगाचे केंद्र बनले, मुंबई-गोवा महामार्ग तयार झाला आणि गुहागर-विजापूरचे महत्त्व कमी झाले. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या या मार्गाचे चौपदरीकरण झाले तर कोकणातील उद्योग, व्यवसाय वाढेल. बंदरे विकसित करून मत्स्य उद्योग आणि कोकणातील शेतीमाल सहज पश्‍चिम महाराष्ट्रात जाऊ शकेल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने गुहागर-विजापूर या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा  दिला आहे. 

या मार्गावरील काही भागाचे तीनपदरीकरण होणार आहे. दाभोळ वीज कंपनीच्या काळात चिपळूण पासून दाभोळ वीज प्रकल्पापर्यंत गुहागरमार्गे दुपदरी रस्त्यासाठी भूसंपादन झाले. गुहागर शहरातील लोकांनी भूसंपादनाला विरोध केला. त्यामुळे शृंगारतळी, पवारसाखरी मार्गे हा रस्ता झाला. आता हा रस्ता तीनपदरी होणार. 

 त्यावेळी रस्ता बनविताना भविष्यातील चौपदरीकरणाची गरज लक्षात घेऊन या रस्त्यासाठी भूसंपादन झाले. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूणकडे आहे. गुहागर चिपळूण मार्गावर कायदेशीर बांधकामे ध्यानी घेतली तर हे लक्षात येते. ८० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय रस्त्यासाठी वर्क ऑर्डर काढली जात नाही. या कामाची वर्कऑडर्र निघाली असेल तर शासनाकडे पुरेशी जागा आहे, असा अर्थ होतो. तसे असेल तर प्रशासन मूग गिळून कशासाठी, असा प्रश्‍न जाणकारांना आहे. 

गुहागर शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयापासून शृंगारतळीपर्यंत, तसेच मार्गताम्हाने बाजारपेठेतील काही भाग सोडला तर गुहागर बायपासपर्यंत (उक्ताड) रस्त्याच्या कडेला फारशी अधिकृत बांधकामे नाहीत. रस्त्याला चिकटून असलेली अनेक दुकाने अनधिकृत आहेत. त्यामुळे विजापूर रस्त्याच्या तीनपदरीकरणासाठी शासनाकडे पुरेशी जागा  उपलब्ध आहे.

दृष्टिक्षेपात...
एन्‍रॉनच्या काळात रस्ता बनला
ऐतिहासिक मार्गाला पुन्हा झळाळी
वर्कऑर्डर निघाली भूसंपादनाविना?
सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त

स्थानिक प्रशासन किंवा गुहागर-विजापूर महामार्ग अखत्यारीत असलेला कोल्हापूर विभाग संदिग्धता कायम ठेवत आहे. प्रशासनाच्या माहिती दडविण्याच्या भूमिकेमुळे स्थानिकांत संभ्रम आहे. यातून विरोधाला बळ मिळते. 
- उदय जोशी, भाजप कार्यकर्ता, गुहागर