महामार्गाने नव्या पर्वाची नांदी

महामार्गाने नव्या पर्वाची नांदी

कणकवली - मुंबई ते गोव्यापर्यंतचा त्याकाळी धुळीचा असलेला हा मार्ग ब्रिटिशांनी दूरदृष्टीने तयार केला. पुढील पन्नास-साठ वर्षांच्या वाहतुकीच्या दृष्टीने या महामार्गाची आखणी करण्यात आली. तर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग ४० प्रतिकिलोमिटर कमाल एवढा निश्‍चित करून मार्गाची आखणी करण्यात आली. 

राष्ट्रीय महामार्गावरील नद्यांवर पुलांची उभारणी झाली आणि या मार्गाच्या विस्ताराला खऱ्या अर्थाने  सुरुवात झाली.

१९१० च्या सुमारास इंग्रजांनी मुंबई ते केरळपर्यंतची बंदरे रस्ता मार्गाने जोडण्यासाठीचा आराखडा तयार केला. त्यासाठी बैलगाडी वापराचा त्यावेळी अस्तित्वात असलेला धुळीचा मार्ग पक्‍का करण्यात आला. या मार्गात अडथळे असलेल्या नद्या, नाले आणि ओढ्यांवर त्याकाळी दगड आणि गूळ तसेच चुनामिश्रीत पूलांची उभारणी करण्यात आली. स्थापत्यशास्त्रातील उत्तम नमुना ठरावा, असे ते दगडी पूल आजही या महामार्गाच्या मजबुततेची साक्ष देत उभे आहेत.

१९३५ मध्ये वाहतुकीस खुला झालेल्या या मार्गाची १९७२ मध्ये सुधारणा करण्यात आली. तर १९८६ मध्ये राज्यमार्ग असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ म्हणून रूपांतरित करण्यात आला. या राष्ट्रीय महामार्गाची वेळावेळी दुरुस्ती येत असली तरी, १९८७ पर्यंत हा रस्ता सिमेंटचा होता; मात्र सिमेंटच्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडत असल्याने १९८७ नंतर सिमेंटचा रस्ता टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात आला आणि डांबरी रस्ता तयार करण्यात आला. आता तब्बल ८० वर्षांनंतर पुन्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सिमेंटचा  होणार आहे.

१९३५ ते २०१६ या ८१ वर्षांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही कमालीचे वाढले. 

मागील पाच वर्षांत विविध अपघातांत तब्बल ६७५ हून अधिक प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला; तर ३ हजारपेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. १९८६ मध्ये झालेल्या वाहतूक प्रगणनेनुसार मुंबई-गोवा महामार्गावर दररोज सरासरी ४ हजार ८३३ जलद आणि ७६४ मंदगतीने वाहने धावत होती; तर २०१४ मधील वाहतूक जनगणनेनुसार मुंबई-गोवा महामार्गावर दररोज सरासरी १ लाख ८५ हजार ९४२ टन एवढी वाहतूक  होत आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाला पुणे, पश्‍चिम महाराष्ट्र, महाबळेश्‍वर व इतर शहरे जोडली गेल्याने दरवर्षी या मार्गावर ८ टक्‍क्‍यांनी वाहतूक  वाढत आहे. 

या तुलनेत रस्ता अरूंदच राहिला त्यामुळे दरवर्षी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली. २०१४ मध्ये या मार्गावर १ हजार ६७२ अपघात झाले. यात ३२३ प्रवाशांना जीव गमवावा लागला. तर १ हजार २०० प्रवासी जखमी झाले. 

मुंबई गोवा महामार्गावर होणारे सतत अपघात, त्यातून होणारी जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी रायगडमधील पत्रकारांनी चौपदरीकरणाचा मुद्दा उचलून धरला. सतत पाच वर्षे लेखणीच्या माध्यमातून आणि थेट रस्त्यावर उतरून त्याचा पाठपुरावा केला. अखेर सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. त्यानंतर पळस्पे ते इंदापूर या टप्प्याच्या चौपदरीकरणाला केंद्राने मंजूरी दिली. पळस्पे ते इंदापूर हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेच इंदापूर ते झाराप या टप्प्याचे चौपदरीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा होती.  पनवेल-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणास २०११ ला जरी सुरुवात झाली असली तरी पहिल्या टप्प्यातील पळस्पे-इंदापूर या मार्गाचे काम विविध कारणांमुळे रखडले. कधी जमिनीचा मोबदला कमी मिळाला म्हणून तर कधी रस्त्याच्या आड आलेली घरे, दुकाने तोडण्यास विरोध झाल्यामुळे. यामुळे या मार्गास वेळ होत होता. अखेर काही ठिकाणी हा मार्ग वळवून पर्यायी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षे उलटले तरीही या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. हा रस्ता करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्‍त केलेले ठेकेदार कुचकामी ठरले. अखेर केंद्रातल्या मोदी सरकारने उशिरा का होईना सरकारने या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी लक्ष घातले आणि निधीही उपलब्ध करून दिला. यामुळे पळस्पे ते इंदापूर हा रस्ता पुढील वर्ष अखेरपर्यंत पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे.

मोदी, गडकरींमुळे चौपदरीकरणाला चालना  
२०११ मध्ये काँग्रेसप्रणीत केंद्र शासनाने मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप या टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणाचा अहवाल देखील केंद्राला सादर झाला. परंतु चौपदरीकरणासाठी निधीची तरतूद न झाल्याने चौपदरीकरण लांबणीवर पडले. २०१४ मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी तातडीने पावले उचलली. चौपदरीकरणासाठी दहा हजार कोटींची तरतूद केली. यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.

दृष्टिक्षेपात
 मुंबई-गोवा महामार्ग १९३५ मध्ये वाहतुकीस खुला
 महामार्गाची १९७२ मध्ये प्रथम सुधारणा
 सन १९८६ मध्ये राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा
 सन १९८७ मध्ये सिमेंटचा महामार्ग डांबरी झाला
 पळस्पे ते इडापल्लीपर्यंतच्या मार्गावर प्रतिदिनी सरासरी १ लाख ८५ हजार ९४२ मेट्रिक टन एवढी वाहतूक
 महामार्गामुळे तळेरे, राजापूर, पाली, लांजा, कणकवली या शहरांचा विकास
 मुंबई-गोवा महामार्गावर २००० ते २०१४ या कालावधीत १९ हजार ६५० अपघात. यात ३ हजार ७८४ जणांचा मृत्यू. तर ११ हजार ४५२ जण जखमी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com