सहाव्यांदा कोकण मंडळ अव्वल

सहाव्यांदा कोकण मंडळ अव्वल

रत्नागिरी -  बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने राज्यात सलग सहाव्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. आज दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर झाला. कोकण मंडळाचा निकाल ९५.२० टक्के लागला. ताणविरहित व कॉपीमुक्त वातावरणातील परीक्षांसाठी उद्‌बोधन वर्ग, संयुक्त मेळावे घेतल्याने हे यश मिळाले, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण चार टक्‍क्‍यांनी अधिक आहे.

फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये बारावीची परीक्षा झाली होती. मंडळाच्या एमआयडीसी येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत काळे यांनी सांगितले, की दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र मिळण्याकरिता यंदा प्रथमच सहा नवीन केंद्रे सुरू करण्यात आली. कॉपीमुक्त अभियानाकरिता जिल्हास्तरावर सभा, तणावविरहित व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षांसाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापकांचे संयुक्त मेळावे घेण्यात आले. वृत्तपत्रे व आकाशवाणीवर ‘बोला काय म्हणता’ याद्वारे मार्गदर्शन केले. गैरमार्गविरोधी अभियान या कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणजे यंदा प्रथमच एकही गैरमार्ग प्रकरण आढळले नाही. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन काटेकोरपणे व वस्तुनिष्ठ होण्यासाठी परीक्षक, नियमकांचे उद्‌बोधन वर्ग तालुकानिहाय घेण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालयांकरिता ३६ परीक्षा केंद्रे व सिंधुदुर्गातील ९५ कनिष्ठ महाविद्यालयांकरता २३ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी नऊ भरारी पथके नियुक्त केली व दररोजचे नियोजन दिले होते. कोकण मंडळात १६५०५ विद्यार्थी व १५५३४ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १५३७९ विद्यार्थी व १५१२१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४.१६ टक्‍क्‍यांनी जास्त असल्याने दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. ३२ हजार ५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व ३२ हजार ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ३० हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्यात बसलेले ४८२ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी २१४ जण उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६१८ पैकी २९३ जण उत्तीर्ण झाले. गुणपत्रिका ९ जूनला दुपारी ३ वाजता कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जूनपर्यंत मुदत दिली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ११ जुलैपासून पुरवणी परीक्षा होणार आहे. त्याच्या तारखा नंतर स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला सचिव आर. बी. गिरी, सहसचिव चंद्रकांत गावडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com