‘आयटीआय’चे स्थलांतर अधांतरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

देवरूख - आयटीआय प्रशासन, बांधकाम विभाग आणि शासकीय विभागाच्या असहकार्यामुळे यावर्षीही संगमेश्‍वरातील आयटीआयच्या इमारतीच्या स्थलांतराचा प्रश्‍न अधांतरी राहण्याची शक्‍यता आहे. 

देवरूख - आयटीआय प्रशासन, बांधकाम विभाग आणि शासकीय विभागाच्या असहकार्यामुळे यावर्षीही संगमेश्‍वरातील आयटीआयच्या इमारतीच्या स्थलांतराचा प्रश्‍न अधांतरी राहण्याची शक्‍यता आहे. 

संगमेश्‍वरमध्ये आयटीआयसाठी २ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून नवीन इमारत उभी करण्यात आली आहे. नव्या इमारतीत पायाभूत सोयीसुविधांचे ९५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. रस्ता, वीज, पाणी अशा आवश्‍यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही आयटीआय प्रशासन नवीन इमारत ताब्यात घेण्यास तयार नाहीत. बांधकाम विभागाने १०० टक्‍के काम पूर्ण करावे मगच आम्ही इमारत ताब्यात घेऊ, असा सूर आयटीआय प्रशासनाने लावला आहे. आधी इमारत ताब्यात घ्या त्यानंतरच पुढील कामे होतील, असा होरा बांधकाम विभागाने लावला आहे. या दोघांमध्ये मध्य साधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश चाचे यांनी पुढाकार घेत संगमेश्‍वरात संघर्ष समितीची स्थापना केली. यातून स्थानिक पातळीपासून जिल्हाधिकारी, मंत्रालय अशा ठिकाणी पाठपुरावा करीत त्यांनी बांधकाम विभाग आणि आयटीआय प्रशासन यांच्यात चार बैठका घडवून आणल्या; मात्र दोन्ही विभाग आपापल्या विषयांवर ठाम राहिल्याने आयटीआयचे घोडे अडलेले आहे. 

यामुळे आता निर्णायक भूमिका घेण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने गेल्याच महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकारी यांनीही गांभीर्याने न पाहिल्याने अखेर सोमवारी दुपारी चाचे यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत आयटीआयच्या रखडलेल्या स्थलांतराबाबत जनजागृतीचे काम सुरू केले. पावसात अनुपमा चाचे, तन्वी चाचे यांच्यासह संघर्ष समितीचे सुशांत कोळवणकर, मधुभाई नारकर, संजय कदम, दिलीपशेठ रहाटे यांनीही चाचेंना साथ दिली. संगमेश्‍वरातील नागरिकांनीही या आंदोलनाला साथ दिली. आंदोलन संगमेश्‍वर परिसरातील प्रत्येक शैक्षणिक संकुलाच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे चाचे यांनी सांगितले. 

पुढील महिन्यात मोठे जनआंदोलन 
स्थलांतरासाठी गेले वर्षभर पाठपुरावा करणारे संघर्ष समितीचे गणेश चाचे यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत पावसात संगमेश्‍वरात या प्रश्‍नाविषयी जनजागृती करणाऱ्या पत्रकांचे वाटप सुरू केले. आठवडाभर हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. परिसरात जनजागृती करून पुढील महिन्यात आयटीआय विरोधात मोठे जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.