विकास गावात; गावकरी मात्र शहरात

तुषार सावंत 
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कणकवली - जिल्ह्यात गेल्या ३०-४० वर्षांत ग्रामपंचायतींची संख्या वाढली. ग्रामपंचायतींना ग्रामविकासासाठीच्या अधिकारांची ताकदही वाढली. मात्र शहरीकरणाचा वेध लागलेला सिंधुदुर्गाच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ शहराकडे ओढला जावू लागला. यामुळे अनेक गावे ओस पडू लागली. एकूणच विकास गावात पोचला असला तरी गावकरी मात्र शहराकडे ओढला गेला आहे.

कणकवली - जिल्ह्यात गेल्या ३०-४० वर्षांत ग्रामपंचायतींची संख्या वाढली. ग्रामपंचायतींना ग्रामविकासासाठीच्या अधिकारांची ताकदही वाढली. मात्र शहरीकरणाचा वेध लागलेला सिंधुदुर्गाच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ शहराकडे ओढला जावू लागला. यामुळे अनेक गावे ओस पडू लागली. एकूणच विकास गावात पोचला असला तरी गावकरी मात्र शहराकडे ओढला गेला आहे.

स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीला ३६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. स्वतंत्र जिल्ह्यापूर्वी दोनशे ग्रामपंचायती आता ४२९ पर्यंत पोचल्या आहेत. विकास प्रक्रियेतील या विकेंद्रीकरणात जिल्ह्यातील सक्षम लोकप्रतिनिधी असलेल्या गावच्या ग्रामपंचायती एका विकासाच्या टप्प्यावर पोचल्या आहेत; मात्र शहरीकरणाकडे लागलेल्या ओढ्यामुळे लोकसंख्या घटून गाव ओसाड पडू लागले आहेत. जिल्ह्यातील निम्म्या शाळा पुढील काळात बंद होण्याच्या स्थितीत आहेत. सुसज्ज इमारती, आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोचून विकासाची गती वाढली असली तरी खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना अस्तित्वात येण्याची गरज आहे.

थेट सरपंचांच्या निवडीनंतर निर्णय क्षमता प्रभावीपणे राबविली जाणार असून यामुळे गाव विकासाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या विकासाची प्रतीक्षा प्रत्येक नागरिकाला लागून राहिली आहे. विकास यंत्रणेचा शेवटचा दुवा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. केंद्र आणि राज्य शासनाचे थेट अनुदान ग्रामपंचायतींना मिळत असल्याने विकास प्रक्रिया सोपी झाली आहे. परंतु ही राबविण्याची क्षमता गावच्या लोकप्रतिनिधीमध्ये असायला हवी तरच गावचा सर्वांगीण विकास होणार आहे. 

राज्याच्या निर्मितीनंतर मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ नुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या आवश्‍यक असून डोंगरी भागाचे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या लोकसंख्येवर आधारित कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त १७ असते. या निकषावर जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती अस्तित्वात येऊ पाहत आहेत. काही महसुली गावांनी ग्रामपंचायतीची मागणी केली असून पुनर्वसन गावठणसाठी ग्रामपंचायत निर्मिती अपेक्षित आहे. यामुळे पुढच्या टप्प्यात जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा विकासात नैसर्गिक साधनसंपत्तीचा महत्वाचा वाटा आहे. त्यातच पर्यटन स्थळे ही गावची वेगळी ओळखही निर्माण होत आहे. पण ज्या गावामध्ये लोकप्रतिनिधी सक्षम आहेत अशा गावचा विकास अनेक टप्प्यांनी पुढे गेला आहे. सुसज्ज इमारती बहुतांशी ग्रामपंचायतीकडे आहेत. शासनाच्या अनेक योजनांचा फायदा मोजक्‍याच गावांनी उठवल्याचे चित्र गेल्या ३६ वर्षात पहायला मिळते. आता आगामी काळातील सरपंचांच्या थेट निवडणुकी म्हणजे गावच्या विकासासाठीचा महत्वाचा निर्णय हा प्रत्येक ग्रामस्थांच्या हक्काचा असणार आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यानंतर खेडेगावांच्या विकासासाठी ग्रामपंचायती अस्तित्वात येऊन पंचायत राज्य व्यवस्थेतील विकास पक्रियेला सुरवात झाली. स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत ग्रामपंचायतींना फारसे महत्त्‍व नसले तरी सरपंचपदाला मान होता. आता मात्र ग्रामसभांना दिलेल्या अधिकाराबरोबरच ग्रामपंचायतींना थेट निधी प्राप्त होऊ लागला. ग्रामविकासात महत्त्‍वाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचाच्या निवडणुका या ६० वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच थेटपणे लढविल्या जात आहेत. या टप्प्यातील ग्रामपंचायत स्तरावर झालेले बदल, जात आणि लिंगानुसार मिळालेले आरक्षण यातून ग्रामविकासाचे नवे स्वप्न साकारले जात आहे. डिजिटल इंडियाच्या घोषणेत ग्रामपंचायतीमध्ये ई-सरकार पोर्टल सुरू होत आहे. लवकरच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने घेतलेला आढावा...

दृष्टिक्षेपात
एकूण ग्रामपंचायती - ४२९ 
सावंतवाडी - ६३
कणकवली - ६३ 
मालवण - ६३
कुडाळ - ६८ 
देवगड - ७२
दोडामार्ग - ३६ 
वेंगुर्ला - ३० 
वैभववाडी - ३४