कणकवली आमसभेत तक्रारींचा पाऊस

कणकवली आमसभेत तक्रारींचा पाऊस

कणकवली - तालुकाभर गावातील खड्डेमय रस्ते, रेंज नसलेला बीएसएनएल दूरसंचारचा विभाग, दिवस-रात्र विजेचा लपंडाव रोखण्यात अपयशी ठरलेला महावितरणचा कारभार यामुळे त्रस्त झालेल्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आजच्या आमसभेत अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा अक्षरश: पाऊस पाडला. तीन तास सुरू असलेल्या आमसभेत सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांवर सर्वाधिक रोष व्यक्‍त झाला. अखेर आमदार नीतेश राणे यांनी, अधिकाऱ्यांना मानसिकता बदला आणि विकासाची गती वाढवून काम करा, असे आवाहन केले.

भगवती मंगल कार्यालयात आमदार नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. पंचायत समितीच्या सभापती भाग्यलक्ष्मी साटम, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, तहसीलदार वैशाली माने, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांच्यासह श्रिया सावंत, संदेश सावंत, विठ्ठल देसाई, मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

बीएसएनएलने दूरध्वनी लाइनसाठी खोदलेले हे चर व्यवस्थित न बुजविल्यामुळे गावागावात अपघात होत आहेत, रस्ते वाहून जात आहेत, भातशेतीमध्ये माती वाहून येत आहे. या साऱ्या प्रकाराकडे बीएसएनएलचे अधिकारी ढिम्म पणे पाहत आहेत, असा आरोप करत डामरे सरपंच चंद्रहास सावंत, पंचायत समिती सदस्य बबन हळदिवे, संतोष कानडे, पपी सावंत आदींसह नागरिकांनी जोरदार आवाज उठवला. 

नागरिकांच्या या तक्रारीवर उत्तर देण्याऐवजी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दूरसंचारची सेवा कशी सुधारत आहे. तालुक्‍यात ७४ नवीन टॉवर बसविले जाणार, मोबाईल रेंज सुधारण्यासाठी कणकवलीत नवीन विभाग झाला, अशी उत्तरे दिली. यामुळे लोकप्रतिनिधी, नागरिकांसह आमदार नीतेश राणेदेखील वैतागले. दूरसंचार अधिकाऱ्यांनी टिपिकल उत्तरे बंद करावीत आणि आणि चांगलं नेटवर्क देता येत नसेल तर सेवा बंद करा आणि इथून निघून जा, असे सुनावले. तसेच बीएसएनएल विरोधात ठराव घेण्याचेही निर्देश दिले.

महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, उपअभियंता श्री. सूर्यवंशी यांच्यावर देखील लोकप्रतिनिधी आणि उपस्थित नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. नगरसेवक अभिजित मुसळे, माजी नगरसेवक भाई परब, शरद कर्ले यांच्यासह विविध गावचे सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या समस्यांचा पाढा वाचला. सोळा हजार लोकसंख्येच्या कणकवली शहरासाठी एकच वायरमन कसा पुरणार, असा प्रश्‍न श्री.मुसळे यांनी उपस्थित केला. वारंवार वीजतारा तुटून शेतकऱ्यांची जनावरे दगावतात. पावसापूर्वी झाडी न तोडल्याने अनेक गावे सतत अंधारात जातात. लाइट बिले दुप्पट कशी झाली, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. कार्यकारी अभियंता श्री. गवळी यांनी कणकवली शहरासाठी जादा वायरमन देऊ, नवीन पदांची भरती झाल्यानंतर गावागावांतील विजेच्या समस्या तातडीने सोडवल्या जातील, अशी ग्वाही दिली. येत्या आठवडाभरात विजेचे प्रश्‍न न सुटल्यास महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला. अखेर आमदार नीतेश राणे यांनी मध्यस्थी केली आणि संयुक्‍त बैठक बोलाविण्याची ग्वाही दिली.

गावागावांतील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, पहिल्याच पावसात वाहून गेलेले डांबरीकरण, मोऱ्या न घालताच केलेले डांबरीकरण, प्रमुख रस्त्यांवर पडलेले भलेमोठे खड्डे आदी प्रश्‍नांचा भडीमार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. आर. बासूतकर यांच्यावर झाला. तळेरे, पियाळी, बिडवाडी, कणकवली शहर, कलमठ, सावडाव धबधबा, फोंडाघाट, चिंचवली, तरंदळे, भरणी येथील लोकप्रतिनिधींनी त्या त्या भागातील रस्त्यांच्या समस्यांबाबत आमदारांचे लक्ष वेधले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. बांधकाम अधिकाऱ्यांना खड्डे बुजवायला वेळ नाही. मात्र लावालावी करून ठेकेदार आणि नागरिकांमध्ये भांडणे लावायला मात्र प्रचंड वेळ आहे, असा आरोप प्रज्ञा ढवण, बबलू सावंत, परशुराम झगडे आदींनी केला. सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी, तालुक्‍यातील सर्व विकासकामांचे प्रस्ताव आपणाकडे द्या. मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करतो, अशी ग्वाही दिली.

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविलेली तळेरे, द्वितीय क्रमांक विजेती जानवली आणि तृतीय क्रमांक विजेत्या कळसूली ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रामसेवकांचा सत्कार झाला. विनायक मेस्त्री यांनी कलमठ जलस्वराज्य प्रकल्पाची लोकवर्गणी मागे देण्याची मागणी केली. मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी ती फेटाळली. बोर्डवेतील शरद साळवी यांनी घरबांधणी नियमांत शिथिलता आणावी, अशी मागणी केली.  

शरद कर्ले, बबलू सावंत, संदीप सावंत, प्रज्ञा ढवण, भाई परब, हेमंत परुळेकर, महेश गुरव, प्रकाश भालेकर, सुरेश सावंत, अतुल दळवी, लक्ष्मण गावडे, पपी सावंत, श्रीकांत राणे, बबली राणे आदींनी आमदार नीतेश राणे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींच्या अभिनंदनाचे ठराव मांडले. तर नागेश मोरये, प्रभाकर ढवळ, अनिल हळदिवे, बबन हळदिवे, सुरेश सावंत, संदेश सावंत, संदीप सावंत, सोनू सावंत, भाई परब, अभिजित मुसळे, मेघा गांगण, गीतांजली कामत, बबली राणे, चंद्रहास सावंत, परशुराम झगडे, रमाकांत राऊत, प्रकाश पारकर, विनायक मेस्त्री, शैलेंद्र नेरकर आदींनी प्रश्‍न विचारले.

सीसीटीव्हीचा तपास करावा
पोलिस प्रशासनाच्या मदतीसाठी आम्ही शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविले. पण या सीसीटीव्हीना जोडणाऱ्या वायर अज्ञाताकडून कापल्या जातात. त्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे आता पोलिसांनीच शहरातील सीसीटीव्हीचं संरक्षण करावं, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना आमदार नीतेश राणे म्हणाले.

पाणी बिलाचा प्रश्‍न अनुत्तरीत
शिवडाव, नाधवडे येथील धरणांतून दरवर्षी मे अखेरीस पाणी सोडले जाते. त्यानंतर नदीकाठच्या गावांना सोडलेल्या पाण्यासाठी पंचवीस हजार रुपये बिलाचा तगादा लावला जातो. अनेक गावांना या पाण्याचा उपयोगच होत नाही. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी नोटिसा का पाठवल्या जातात असा प्रश्‍न चिंचवली, कुरंगवणे, वरवडे आदी गावातील लोकप्रतिनिधींनी केला. मात्र त्याचे समर्पक उत्तर लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी देऊ शकले नाहीत.

...तर दप्तर गुंडाळावे 
गावागावात जसं बीएसएनएलचे नेटवर्क भेटत नाही, तसे या खात्याचे अधिकारीही जनतेला भेटत नाहीत. चांगली सेवा देता येत नसेल तर बीएसएनएलने आपलं दप्तर गुंडाळावं आणि निघून जावं आम्ही दुसरी कंपनी सिंधुदुर्गात आणू.

कणकवलीचे मुख्याधिकारी टार्गेट
शहरातील पार्किंग आरक्षण विकसित करण्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि मुख्याधिकारी यांच्यात गेले चार महिने वादंग सुरू आहे. याचे पडसाद आमसभेतही उमटले. नगरसेवकांना विश्‍वासात न घेता मुख्याधिकारी मनमानी करत असल्याबद्दल आमदार श्री. राणे यांनी खंत व्यक्‍त केली तसेच त्यांच्याविरोधात आमसभेत ठराव घेण्याचेही निर्देश दिले. चुकीच्या पद्धतीने पार्किंग आरक्षण विकसित झाले आणि दुर्घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवरच असेल असेही आमदार श्री.राणे म्हणाले. दरम्यान पार्किंग प्रश्‍नावर नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक अभिजित मुसळे, अनुपम कांबळी आदींनी प्रश्‍न उपस्थित केले होते.

‘बांधकाम’च्या अधिकाऱ्यांची उत्तरे
 देवगड-निपाणी रस्त्याचे लवकरच दुपदरीकरण; यात फोंडाघाटमधील रस्त्याचे रुंदीकरण होईल
चिंचवली-तिथवली गावे जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव शासनाकडे
आचरा बायपास रस्त्यासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव. यातील तीन कोटी मंजूर; तर प्रत्यक्षात ७५ लाख प्राप्त झाले
सावडाव पर्यटन रस्त्याची दुरवस्था; निधी नसल्याने काम नाही. मात्र तातडीने खड्डे बुजविले जातील
कणकवली-आचरा मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम लवकरच
तरंदळे-भरणी संपूर्ण रस्ता खचला. पूर्णतः नवीन रस्ता करण्याचा प्रस्ताव; मात्र मंजुरी नाही.

महावितरणच्या अधिकाऱ्यांची उत्तरे
कणकवलीसाठी दोन जादा वायरमनची नियुक्‍ती तातडीने
महावितरण कार्यालयात तक्रारीसाठी येणारे कॉल न स्वीकारल्यास कर्मच्याऱ्यांवर कारवाई
वीज वाहिन्यांतून जाणारी झाडी तोडण्यासाठी निविदा मंजूर खारेपाटण फिडरपासून काम सुरू
वाढीव वीज बिलांबाबत निराकरणाची कार्यवाही सुरू आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com