दक्षिणेकडील वाऱ्यामुळे मासेमारीला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मालवण - जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मासेमारी हंगामाची दमदार सुरवात झाल्यानंतर गेले काही दिवस सुरू असलेल्या दक्षिणेकडील वाऱ्यामुळे मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. पेडवे, तारली यासारखी किरकोळ मासळीच मच्छीमारांना उपलब्ध होत आहे. यामुळे मत्स्यखवय्यांचे चोचले पुरविण्यासाठी रत्नागिरी, मुंबई येथून मासळीची आयात करावी लागत आहे. 

मालवण - जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मासेमारी हंगामाची दमदार सुरवात झाल्यानंतर गेले काही दिवस सुरू असलेल्या दक्षिणेकडील वाऱ्यामुळे मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. पेडवे, तारली यासारखी किरकोळ मासळीच मच्छीमारांना उपलब्ध होत आहे. यामुळे मत्स्यखवय्यांचे चोचले पुरविण्यासाठी रत्नागिरी, मुंबई येथून मासळीची आयात करावी लागत आहे. 

आयात मासळीमुळे येथील समुद्रातील ताज्या फडफडीत मासळीचा आस्वाद मात्र खवय्यांना घेता येत नसल्याचे पहावयास मिळत आहे. दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर आणखी काही दिवस असाच राहणार असल्याचे जाणकार मच्छीमारांनी सांगितले. गणेशोत्सवात मत्स्य खवय्यांचे प्रमाण कमी असले तरी माशांची आवक घटल्याने  उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.

यावर्षीच्या ऑगस्टपासून सुरवात झालेल्या मासेमारी हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेट, कोळंबी, बांगडा यासारख्या मासळीची चांगली कॅच मिळाली. गणेशोत्सवापूर्वी मोठ्या प्रमाणात मासळी मिळाल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, गणेशोत्सवात पावसाने हजेरी लावल्याने दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर वाढला. या वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात पोषक हवामान नसल्याने याचा मोठा परिणाम मासेमारीवर झाला आहे. 

गेल्या पाच-सहा दिवसांत दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर वाढला आहे. या वाऱ्यात समुद्रात मासेमारी गेल्यास नौका भरकटण्याची शक्‍यता असल्याने अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आणखीन दोन ते तीन दिवस वारे वाहतील, असा अंदाज मच्छीमार बांधवांकडून व्यक्त केला जात आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मासेमारी ठप्प झाल्याने येथून मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव आदी बाजारपेठेत निर्यात होणाऱ्या मासळीवरही परिणाम झाला आहे, असेही मच्छीमारांनी सांगितले.

पापलेट ७५०, सुरमई ८५० रुपये किलो 
पाच, सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मुंबईकर चाकरमान्यांकडून किमती मासळीची मागणी वाढली. मात्र, दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने स्थानिक मच्छीमारांना किमती मासळीच मिळाली नाही. सध्या स्थानिक बाजारपेठेत पेडवे, तारली यासारखी मासळी काही प्रमाणात उपलब्ध आहे. मत्स्य खवय्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी हॉटेल्स व्यावसायिकांनी मुंबई, रत्नागिरी येथून पापलेट, सुरमई, बांगडा यासारख्या मासळीची आयात केली आहे. यात पापलेट ७५० रुपये किलो, सुरमई ८५० रुपये किलो, तर बांगडा ५२ रुपये नग या दराने उपलब्ध झाला आहे. येथील समुद्रातील ताजी मासळी मिळत नसल्याने पर्यटक तसेच मत्स्य खवय्यांकडून आयात केलेल्या मासळीचा आस्वाद लुटला जात आहे.

Web Title: konkan news malvan news Fishing