विठ्ठल नामाच्या गजराने निनादती सायंकाळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मंडणगड -  तो हा विठ्ठल बरवा...तो हा माधव बरवा...सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...जय जय विठोबा रखुमाई...असे भक्तिमय सूर नाल, टाळ, संगीतपेटी यांच्या साह्याने वातावरणात घुमत असल्यामुळे श्रावण महिना असा नादमय अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांमधून सूर आणि नाद यांचा प्रत्यय मिळत आहे. श्रावण महिना हा सर्वांगाने वेगळा. 

निसर्गाने हिरवाईचा शालू पांघरला आहे. पावसाने निसर्गातील निष्पर्ण झालेल्या, सुखलेल्या, जीर्ण झालेल्या वृक्षांना पुन्हा जीवितावस्थेत आणून श्रावणाने त्यांना फुलवण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे गावोगावी पौराणिक ग्रंथ, भजन, कीर्तन, हरिपाठ यांमधून मानवी मनाला भक्तिमय वातावरणात आणून त्यांच्या निस्तेज झालेल्या मनाला ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम या वातावरणातून होत आहे. ग्रामीण जनतेच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली पांडुरंगरूपी संध्याकाळ मन निर्मळ व प्रफुल्लित करणारी असते. ग्रामीण भागातील शेतकरी दिवसभर आपल्या शेतात राबत असतो. काबाडकष्ट करीत असतो. संध्याकाळी घरी परतेपर्यंत तो पूर्ण थकून गेलेला असतो. त्याच्या थकलेल्या शरीराला आणि निस्तेज मनाला दुसऱ्या दिवशीही कष्ट करण्याची उभारी या माउलीरूपी संध्याकाळी मिळते. जीवनाचे सार सांगणारे अभंग, अखंड हरिनाम आपल्या मुखातून गाऊ लागल्यानंतर दिवसभराचा क्षीण निघून जातो. क्षीण जाण्यासाठी त्याला कुठल्याही औषधांची मात्रा लागू होत नाही; मात्र पांडुरंगाच्या नामस्मरणात ती ताकद आहे. मन निरोगी करण्याची किमया तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाई, मुक्ता यांच्या अभंगातील प्रत्येक शब्द करतात. ह.भ.प. दिनेश पोस्टुरे महाराज यांच्या भजन, कीर्तनात, मृदुन्गमणी योगेश पवार यांच्या सूरमयी वादन व त्यांनी गायिलेल्या अभंगातून मने न्हाऊन निघत आहेत. दिलीप माळी, सुरेश जाधव अशा अनेकांची त्यांना साथसंगत मिळत असून ग्रामस्थ व महिलांचा या विठू नामाच्या भक्ती सागरात विहार सुरू आहे.