पहिल्या पावसानंतर  खेकडे पकडण्याची लगबग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

रात्री ओढ्यांवर जाऊन खेकडे पकडण्याची मजा काही और आहे. रात्री हे खेकडे बिळाबाहेर येत असल्याने पकडण्यास सोपे जाते; पण त्यालाही कसब लागते. दरवर्षी मी न चुकता खेकडे पकडण्याचा आनंद लुटतो.
- संदीप खांबे

मंडणगड - कोकणात पावसाचे दमदार आगमन झाले. मंडणगड तालुक्‍यात चार दिवसांत जोरदार पावसाने नद्या, नाल्यातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे खेकड्यांचा हंगाम सुरू झाला आहे.

या काळात पिल्ले सोडण्यासाठी बिळातून खेकडे बाहेर येतात. त्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थांच्या रात्री जागवल्या जात आहेत.पावसाळ्यास सुरवात होऊन   नदी, नाले, शेतात, ओढ्यात पाणी झाले की, खेकड्यांचा मोसम सुरू होतो. पहिल्या पावसानंतर तालुक्‍यात सर्वत्र बऱ्यापैकी पाणी साटले आहे. बिळातील खेकडे पिल्ले सोडण्यासाठी रात्री बाहेर आल्यावर ते पकडले जातात. एक खेकडा कमीत कमी शंभर ते दीडशे पिल्ले सोडून देतो. त्यावेळी ते एका जागेवर स्थिर असतात. गावागावांतून अनेकजण टोळीने रात्रीच्या वेळेस विजेऱ्यांच्या प्रकाशात हे खेकडे पकडण्यासाठी जातात. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून रवाना होऊन तीन-चार तासांत पुन्हा घरी परततात. त्यांना मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे खेकडे सापडतात. एका खेपेस ६० ते ७० खेकडे पकडून आणतात. त्यामुळे सध्या खेकड्यांची मेजवानी सुरू आहे. विजेरीच्या प्रकाशात पकडलेल्या खेकड्याला पिशवीत टाकताना त्यांना कसरत करावी लागते. खेकडा पकडताना अंदाज चुकला आणि खेकड्याने एकदा का आपल्या अंगड्यात हाताला चावा घेतला की बोबडी वळते. पाण्याचा प्रवाह गतिशील झाला की चढणीच्या माशांचा हंगाम सुरू होतो. हौशी मंडळींना त्याचीही प्रतीक्षा आहे. सध्या खेकड्यांचा फक्कड रस्सा दोन दिवसांतून एकदातरी जेवणात असतोच असतो. तालुक्‍यात काही ठिकाणी या खेकड्यांची विक्रीही केली जाते. काहींसाठी तो रोजगारही झाला आहे.

टॅग्स