नव्या सावित्री पूलाचे उद्या उद्घाटन, चौकशी अजूनही गुलदस्त्यातच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

पूल केवळ 165 दिवसात बांधून झाला असला तरीही अपघाताची कारणे,जुन्या पूलाची चौकशी अजूनही गुलदस्त्यातच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी व अनंत गीतें यांच्या हस्ते सोमवारी या पूलाचे उद्घाटन होणार आहे

महाड - मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर महाड जवळील राजेवाडी गावच्या हद्दीत असलेला सावित्री नदीवरील नवा पूल केवळ 165 दिवसात बांधून झाला असुन या पूलाचे उद्धाटन 5 जूनला होत आहे. 2 ऑगस्ट, 2016 ला सावित्री नदीवरील जूना पूल कोसळल्याने चाळीस जणांना जलसमाधी मिळाली होती.या पूला जवळच हा नवा पूल उभा राहिला आहे. पूल केवळ 165 दिवसात बांधून झाला असला तरीही अपघाताची कारणे,जुन्या पूलाची चौकशी अजूनही गुलदस्त्यातच आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी व अनंत गीतें यांच्या हस्ते सोमवारी या पूलाचे उद्घाटन होणार आहे. सावित्री नदीवर 1928 साली ब्रिटिशकालीन दगडी कमानीचा पूल बांधलेला होता. अकरा कमानी असलेला 180 मीटर लांबीचा हा  पूल 2 ऑगस्ट, 2016 ला रात्री साडेअकरा वाजता कोसळला.या दरम्यान कोकणातून मुंबईकडे जाणारी तीन वाहने सावित्री नदीच्या पात्रात बुडाली. यामध्ये जयगड येथून मुंबईकडे जाणारी व राजापूर येथून बोरीवली कडे जाणा-या एस.टी. बसेस चा तर मुंबईकडे जाणा-या तवेरा गाडीचा समावेश होता. या वाहनातून प्रवास करणारे सर्व प्रवासी मरण पावले. या घटनेनतर येथे दहा दिवस मदतकार्य सुरु होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी येथे नवा पूल बांधण्याची घोषणा केली होती. त्यानुसार निविदा निघाल्यापासून सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्यात आला आहे.

राज्य सरकारने 20 ऑगस्टला केंद्राक़डे या बाबत प्रस्ताव पाठविला ,तातडीने केवळ अकरा दिवसांमध्ये केंद्राने प्रक्रिया पूर्ण केली आणि 2 सप्टेंबर 2016 ला नवीन पूल बांधण्याची निविदाही प्रकाशित झाली. 1 डिसेंबरला निविदा उघडल्यानंतर पुण्याच्या टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला त्याचे कंत्राट मिळाले. त्यांनंतर 15 डिसेंबरला कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) दिली गेली. 15 जून 2017 पर्यंत म्हणजे सहा महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याची अटच त्यामध्ये घालण्यात आली. केवळ 165 दिवसांमध्ये म्हणजे 31 मे 2017 ला हा पूल तयार झाला आहे

अपघातात चाळीस जणांना जलसमाधी; त्यातील तीस मृतदेह सापडले.
शासनाकडून चार लाख व एसटी कडून दहा लाखाची मदत
तवेरातील प्रवाशांना शासनाकडून सहा लाख

या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलोली होती..सरकारने या अपघाताच्‍या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिश  एस. के. शहा आयोगाची नेमणूक केली . अपघातानंतर तब्‍बल 9 महिन्‍यानंतर 12 मे ला आयोगाने दुर्घटनाग्रस्‍त पूलाची पाहणी केली.जुना सावित्री पूल वाहून जाण्या मागील कारणे, घटना नैसर्गिक आपत्तीमुळे की मानवी चुकीमुळे घडली याची पडताळणी करणे , दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी ही समिती पार पाडणार आहे.

कोसळलेल्या जुन्या पूला जवळ महामार्ग विभागाने 1996 साली नवा पूल बांधलेला होता परंतु केवळ कोकणात जाणारी वाहने या पूलावरुन जात होती. तरीही जुन्या पूलावरुन वाहतूक का सुरु होती,जूना पूल वाहतूकीला का बंद करण्यात आला नाही व याला जबाबदार कोण अशा प्रश्नांची उत्तरे अजूनही बाकी आहेत. 

सावित्रीवरील नवा पूल 
एकूण लांबी : 239 मीटर एकूण 11 गाळे
एकूण रुंदी : 16 मीटर (फुटपाथसह तीन पदरी)
उंची : 11 मीटर 
खर्च : 35 कोटी 77 लाख