पालघरमधील विकासकामांचा सवरांकडून आढावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

गेली 3 वर्षात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून करोडो रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, विकास कामे त्या गतीने झालेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. कामांना तरतूद असुनही, विकास कामांना कुठे खिळ बघतेय याचा मागोवा विष्णु सवरा यांनी जव्हार मध्ये आढावा बैठकीत घेतला

मोखाडा - "पालघर जिल्हा निर्मितीला आणि युती सरकारच्या कार्यकाळास तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले असून पालघर जिल्हयाच्या विकासासाठी कोटय़वधींचा निधी ऊपलब्ध करून दिला आहे. असे असतांना विकास कामे होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे तातडीने सर्व खात्यांच्या प्रमुख अधिकाऱयांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला आहे. तसेच विकास कामे तातडीने सुरू करून मार्च अखेरपर्यंत निधी खर्च करून प्रत्यक्ष दर्शी कामे करावीत आणि पालघर जिल्हयातील विकास कामांना बसलेली खिळ काढावी,' असे कडक निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी दिले आहेत. कामात कसूर  करणार्‍या अधिकारी अथवा कंत्राटदाराची गय केली जाणार नसल्याची माहिती, जव्हार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सवरा यांनी दिली आहे.

गेली 3 वर्षात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून करोडो रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, विकास कामे त्या गतीने झालेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. कामांना तरतूद असुनही, विकास कामांना कुठे खिळ बघतेय याचा मागोवा विष्णु सवरा यांनी जव्हार मध्ये आढावा बैठकीत घेतला आहे. त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक बाबींची ऊकल झाली आहे. 

रस्ते , पूल व मार्ग  (  5054 सरकारी शिर्ष ) या शिर्षाखालील सुमारे 1361 कामांसाठी 333  कोटी , दुसर्‍या रस्ते , पूल, व मार्ग  ( 3054 शिर्ष )   या शिर्षाखालील 429 कामांसाठी 41.77  कोटी मंजूर केले आहेत. तर ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत  760 कामांसाठी सुमारे  69.37  कोटी रूपयांची भरीव तरतूद केल्याची माहीती विष्णु सवरा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. परंतु निधी मंजूर असून त्याप्रमाणात विकास होतांना दिसत नाहीत. त्यामुळे विकास कामे करण्यासाठी काय अडचणी आहेत, या कामांना कशामुळे खिळ बसली आहे, याचा आढावा विष्णु सवरा यांनी जिल्हाधिकारी डाॅ. प्रशांत नारनवरे यांच्यासह घेतला. बर्‍याच अंशी कामे खोळंबलेली आढळली आहे. तर काही कामे प्रगतीत असल्याचे सवरांनी सांगितले.  

सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कामे पूर्ण करण्याची तयारी केली असल्याचे सांगितले. दरम्यान, मार्च अखेर कामे पूर्ण करण्याची वाट न बघता दोन महिन्यांतच कामे पूर्ण करण्याचे निर्देश आपण अधिकार्यांना दिल्याचे सवरांनी सांगितले आहे. पुर्वी च्या ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत भ्रष्टाचार आणि सदोष असलेल्या कामांची चौकशी करावी, मात्र, त्यानंतर मंजूर करण्यात आलेल्या कामांना गती देऊन त्याचा निधी वितरित करण्याच्या सूचना संबंधीत अधिकार्यांना दिल्या आहेत. विकास कामांत हलगर्जीपणा, वेळकाढूपणा, किंवा सदोष कामे करणार्‍या कंत्राटदार अथवा अधिकाऱयांची गय केली जाणार नसल्याचा इशारा सवरा यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

तथापी, जिल्ह्य़ाच्या विकास जलदगतीने होण्यासाठी दोन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी सुमारे  900  कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून त्याचा गौरव शासनाने केला आहे. त्यासाठी जनता , अधिकारी आणि पत्रकार यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याने सवरा यांनी सर्वाचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील  विकास कामे पूर्ण करून नागरिकांना अच्छे दिन येणार असल्याचा आशावाद सवरा यांनी यावेळी व्यक्त केला आहे