प्राथमिक शाळांची प्रगती ८३ टक्‍क्‍यांवर

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 29 जून 2017

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - गणित, भाषेसाठी विशेष अभियान

रत्नागिरी - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी ८३ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत १०० टक्के प्रगती करण्याचे उद्दिष्ट जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने ठेवले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे शक्‍य करण्याकरिता शिक्षकांनी मेहनत घेण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी दिली.

शासनाच्या धोरणानुसार पायाभूत व संकलित चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांना १०० टक्के प्रगत करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात आला. संकलित चाचणीमधून विद्यार्थी निश्‍चित करण्यात आले. तालुकानिहाय केंद्रांची निवड करण्यात आली. गणित, भाषा विषयांमध्ये शंभर टक्के प्रगती करण्याकरिता रत्नागिरी तालुक्‍यात विशेष लक्ष केंद्रित केले. तत्पूर्वी, निवडलेल्या शाळांमधील शिक्षक, केंद्रप्रमुख, अधिव्याख्याता, विषय साधन व्यक्तींची बैठक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. संवाद कार्यशाळा, शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली.

अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे होते. विविध उपक्रम, स्थानिक शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून या विद्यार्थ्यांना गणित, भाषेतील मूलभूत संकल्पना समजावून देण्यात आल्या. संकलित चाचणी क्र. १ मधून प्रश्‍ननिहाय विश्‍लेषण करून विद्यार्थी नेमके कुठे मागे पडतात, कुठे अडचण आहे, याची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर गणित पेटी, ज्ञानरचनावादी साहित्याचा प्रभावी उपयोग करून गणित व भाषेतील अडचणी दूर करण्यात यश मिळू लागले. गणितातील वजाबाकी, भागाकार विद्यार्थी गोंधळतात. त्यावर उपाय म्हणून सोपे गणित व त्याच्या पायऱ्या कशा कराव्यात हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. काही शाळांमध्ये शिक्षकांनी आणखी क्‍लृप्त्या वापरल्या. 

राज्यातील पहिल्या वीस केंद्रांमध्ये लांजा तालुक्‍यातील केंद्रांचा क्रमांक थोडक्‍यात हुकला; परंतु यंदा लांजा, रत्नागिरी आणि चिपळूण, संगमेश्‍वर, गुहागर या तालुक्‍यांतील केंद्रे नक्कीच दिसतील. याचे नियोजन करण्यात येत आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.