पावसाच्या सरासरीत गतवर्षीच्या तुलनेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

वाऱ्यालाही जोर - जिल्हाभर नुकसानसत्र सुरूच; यंदा आजवर १५२ मि.मी. जादा पाऊस
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात गेले चार दिवस झालेल्या दमदार पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत सरासरी वाढली आहे; मात्र पावसाला वाऱ्याची जोड असल्याने नुकसानसत्र मात्र कायम आहे.

वाऱ्यालाही जोर - जिल्हाभर नुकसानसत्र सुरूच; यंदा आजवर १५२ मि.मी. जादा पाऊस
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात गेले चार दिवस झालेल्या दमदार पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत सरासरी वाढली आहे; मात्र पावसाला वाऱ्याची जोड असल्याने नुकसानसत्र मात्र कायम आहे.

जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सरासरी यावर्षी आतापर्यंत १५१ मिलीमीटर पाऊस अधिक पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाने वेळीच १ जूनपासून सुरुवात केली आहे. मे अखेरीस मान्सूनपूर्व पाऊसही दमदार झाला. त्यामुळे शेतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ७९६.०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर गतवर्षी एकूण सरासरी ६४५ मिलीमीटर पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील रस्त्यालगत मोठ-मोठ्या झाडांची संख्या अधिक आहे. तर काही ठिकाणी धोकादायक स्थितीत रस्त्यावर कलंडलेली झाडे आहेत. जुनाट धोकादायक झाडे तोडून रस्ते वाहतुकीस सुरक्षित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यावर झाडे पडण्याचे प्रमाण अधिक आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरालगत जुनाट झाडे धोकादायक असल्याने जिल्ह्यात घरावर झाडे पडून नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. घरावर झाड पडल्याने २५ हून अधिक घरांचे आतापर्यंत नुकसान झाले आहे. तर सार्वजनिक मालमत्तेचेही झाडांमुळेच नुकसान झाले आहे.

महावितरणला आळस नडला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाडा-झुडपातून गावागावात विद्युत पुरवठा केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विद्युत वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या झाडांना स्पर्श करून जात आहेत; मात्र वीज वितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्याकडे दुर्लक्ष केल्यानेच पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसत आहे. विद्युत वाहिन्यावरील झाडाच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडण्याबाबत महावितरण कंपनीने केलेला आळस सद्य:स्थितीत वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नडल्याचे स्पष्ट होत आहे.