प्रपात फेसाळले... पण पर्यटकांपासून दूरच!

प्रपात फेसाळले... पण पर्यटकांपासून दूरच!

राजापूर - कोकणाला निसर्गदत्त लाभलेल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे. या निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात काही तास रमलेल्याचा काही क्षणांचाही आनंद औरच असतो. पर्यटकांच्या नजरा आणि मने  खिळवून ठेवणाऱ्या या नैसर्गिक सौंदर्याच्या खजिन्यामध्ये धबधबे सर्वात आकर्षक. तालुक्‍यात जोरदार पावसामुळे आकाशातून ओघळणारे मोती झेलण्यासाठी पर्यटक धाव घेत आहेत.

तालुक्‍यातील शहरानजीकच्या धोपेश्‍वर येथील मृडाणी नदीवरील धबधबा, चुनाकोळवण येथील सवतकडा आणि परीट कड्याचा धबधबा, ओझर येथील धबधबा, हर्डी येथील कातळकडा ही ठिकाणे वर्षा सहलीसाठी अत्यंत आवडीची ठरत आहेत. वनराईमधून मनसोक्त हुंदडत अवखळपणे वाहणाऱ्या या धबधब्यांच्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने त्याकडे वळत आहेत.

धबधब्यांपर्यंत पोचण्यासाठी पर्यटकाला चिकाटीच दाखवावी लागते. या धबधब्यांकडे जाणारे रस्ते वा पायवाटा यांची स्थिती दयनीय आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची संख्याही मर्यादित आहे. धबधब्यांकडे इच्छा असूनही अनेकदा जाणे शक्‍य होत नाही. या धबधब्यांविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या स्थानिक व्यक्तींचीही (गाईड) त्या परिसरात वानवा आहे. पर्यटकांना आवश्‍यक असलेल्या सोयी-सुविधाही तेथे नसल्याने पर्यटकांचा ओघ वाढून त्याचा या परिसराला काहीही फायदा होत नाही. अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक ग्रामस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पुढाकार घेतल्यास तालुक्‍याच्या विकासाला पर्यटनाच्या माध्यमातून चालना मिळू शकेल. तालुक्‍यातील चार ठिकाणी असलेले उत्तम धबधबे पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठीही मुळात प्रयत्न झालेले नाहीत. तसे झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढू शकेल. मात्र पर्यटनवाढीच्या या क्षमतेकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com