मुंबईतील चाकरमान्याला खेड्यात परत आणायचंय!

मुंबईतील चाकरमान्याला खेड्यात परत आणायचंय!

रत्नागिरी - कोकणातील चारही जिल्ह्यांत व प्रायशः रत्नागिरी-सिंधुदुर्गात कृषी पर्यटनासाठी असलेली क्षमता पूर्णपणे वापरता आली, तर येथील तरुणांना रोजगारासाठी मुंबईत जाण्याची गरज पडणार नाही. कृषी पर्यटनाचा विस्तार करताना कोकणातील तरुण चाकरमान्यांना पुन्हा गावाकडे वळवणे हा कोकणभूमीत कृषी पर्यटन सहकारी संस्थेचा एक महत्त्वाचा हेतू आहे. गेली आठ वर्षे त्यासाठी काम सुरू आहे, अशी माहिती संस्थेच्या चिटणीस मीनल ओक यांनी दिली.

कोकणभूमी प्रतिष्ठान या कोकणसाठी काम करणाऱ्या व कोकण ग्लोबल करणाऱ्या संस्थेशी त्यांचा परिचय महाविद्यालयीन काळात २००० ला झाला. पर्यटनामधील समस्या आणि संधी याचा अभ्यास करताना कोकणभूमी प्रतिष्ठानकडे ओक वळल्या. त्यातूनच पुढची वाटचाल सुरू झाली. ‘कोकणभूमी’ने सुरवातीला रायगडमध्ये काम सुरू केले. २०१३, १४ व १५ ला तीन वर्षे चिकू महोत्सव डहाणूत भरवला. २०१२ ला कुडाळमध्ये आंबा महोत्सव तसेच त्यानंतर कृषी पर्यटन परिषद आयोजित केली. मुंबईत दरवर्षी संस्थेतर्फे दोन वेळा परिषद भरवली जाते. कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहेत. तेथील जीवन आणि रोजगार यापेक्षा कितीतरी सरस जीवनशैलीत ते खेड्यात येऊन जगू शकतात, हे ठसवण्यासाठी परिषद मुंबईत होते. संस्थेतर्फे वर्षातून तारपा येथे तीन कार्यशाळा होतात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या क्षमतांवर चर्चा होते. आदान-प्रदान होते. संस्थेतर्फे कृषी पर्यटन प्रकल्प उभारणीसाठी साह्य, मार्गदर्शन केले जाते.

कृषी पर्यटनाला प्रचंड वाव असून त्याबाबत गती का नाही हे सांगताना ओक म्हणाल्या की, कोकणची मानसिकता मुळात आड येते. आपल्याकडे बदल करायला धाडस नाही. शिवाय अल्पसंतुष्टता आहे. आपला परिसर व पर्यावरण याआधारे व्यवसाय होऊ शकतो. त्यासाठी बदल होण्यास तयार नाही. कामगारांचा प्रश्‍न शिवाय परवानग्या, त्यासाठी सरकार दरबारी मारावे लागणारे खेटे अशा साऱ्या गोष्टी त्या उद्योगाच्या गतीला ब्रेक लावत आहेत. तरीही आम्ही आशावादी आहोत, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

शासनाकडूनही दूरदृष्टी हवी
कृषी पर्यटन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. त्यामुळे त्याला सवलतीही मिळाव्यात. कोकणात तो अधिक व्यापक करता येणेही शक्‍य आहे. त्यासाठी सरकारनेही धोरणामध्ये दूरदृष्टी दाखवावी. नदी, खाडी किनाऱ्यावरील निसर्गसमृद्ध गावांमध्ये दहा वर्षांत १० हजार कृषी पर्यटन केंद्र सुरू व्हावीत, यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याची माहितीही ओक यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com