हिरवाईने सजलं कोकणचं सौंदर्य !

हिरवाईने सजलं कोकणचं सौंदर्य !
हिरवाईने सजलं कोकणचं सौंदर्य !

देवरुख (रत्नागिरी): कोकण म्हटलं, की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या-खाड्या आणि अथांग समुद्र ! कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे, हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच ! सर्वत्र पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते. डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. गढूळ पाण्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पाश्वर्भूमीवर उनपावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण असतं. सलग सुट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करीत आहे.

राज्याच्या विविध भागात पडणाऱ्या पावसाची दरवर्षीची आकडेवारी पाहिली, तर लक्षात येते कोकण पावसाच्या सरासरीत दरवर्षी आघाडीवर असते. यावर्षीही कोकणात राज्यातील अन्य भागाच्या  तुलनेत पाऊस उत्तम झाला असून शेती चांगलीच बहरली आहे. पावसाने पेरणीपासून आता भात फुलोऱ्याला येइपर्यंत शेतकऱ्यांना चांगली साथ दिली आहे. कोकणचे सौंदर्य हे खरंतर पावसावरच अवलंबून असतं. दरवर्षी वरुणराजा कोकणचं हे सौंदर्य अबाधित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्यात चारही महिन्यात कोकणचा निसर्ग आपलं रुपडं टप्याटप्याने पालटत असतो. कोकणचं खरं सौंदर्य बहरतं ते श्रावण आणि आश्विन महिन्यातच.

श्रावणात कोकणची माळराने रानफुलांनी बहरुन येतात. विविधरंगी आणि आकाराची ही रानफुले म्हणजे अभ्यासकांना एक पर्वणीच असते. पाऊस थोडा कमी होवून उनाची तिरीप आली , की ही रानफुले हिरव्या माळरानावर वाऱ्यासंगे डोलू लागतात. निसर्गातील हे चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे कोकणवासीयांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते. कोकणचं पर्यटन हे शांत आणि सुरक्षित असल्याने नेहमीच समृद्ध समजले जाते. कोकणात येणारे पर्यटक स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकले, की पर्यटनस्थळे बदनाम होणार नाहीत हे पर्यटकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. सध्या मात्र ही हिरवाई कोकणच्या सौंदर्यात भर घालत आहेत यात शंका नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com