आणखी एका मंत्र्यांचे बुरोंडी जेटीचे आश्‍वासन!

आणखी एका मंत्र्यांचे बुरोंडी जेटीचे आश्‍वासन!

दाभोळ - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली दौऱ्यात बुरोंडी बंदराला भेट दिली. तेथील मच्छीमारी जेटीचा विषय मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन मच्छीमारांना दिले. तसेच दाभोळ येथील मच्छीमारांना वेगळी जेटी हवी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली.

दापोली तालुक्‍यातील बुरोंडी हे पारंपरिक मच्छीमारी बंदर म्हणून ओळखले जाते. गेली अनेक वर्षे येथील जेटीचा प्रश्‍न शासन पातळीवर प्रलंबितच आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात बंदर मंत्री नारायण राणे यांनी या बंदराला 

भेट देऊन लवकरच या बंदरात अद्ययावत जेटी बांधण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आता राज्यमंत्री चव्हाण यांनी या बंदरामधील जेटीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण नक्‍कीच प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. त्यांनी बुरोंडी मच्छीमार सोसायटीलाही भेट दिली.

चव्हाण यांनी दाभोळ बंदर व भारती शिपयार्ड कंपनीला भेट दिली. दाभोळ खाडीतून चिपळूण येथील गोवळकोटपर्यंत लाँच सेवा अनेक वर्षे सुरू होती. त्याला घरघर लागली.  परिणामी खाडीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अनेक जेट्‌या नादुरुस्त झाल्या. काही नष्ट झाल्या. मच्छीमारी नौकांमधून दाभोळ जेटीवर मासे उतरविण्यासाठी मच्छीमारांना स्वतंत्र व्यवस्था नाही. गेली अनेक वर्षे येथील मच्छीमार धक्‍क्‍याचाच वापर करतात. येथून रोरो रो रो सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे येथील धक्‍क्‍याचा वापर मच्छीमारांना करता येणार नाही. म्हणून मच्छीमारांसाठी स्वतंत्र जेटीची मागणी उदय जावकर यांनी केली. दाभोळ धक्‍क्‍यावर ३२ लाख खर्चून बांधण्यात आलेले सुलभ शौचालय बंद आहे. ते खुले करण्याचीही मागणी करण्यात आली.

चव्हाण यांच्या समवेत माजी आमदार बाळ माने, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे, शशिकांत चव्हाण, बावा केळसकर, उदय जावकर, सौ. स्मिता जावकर, अमर पावसे, संजय सावंत, मकरंद म्हादलेकर, अजय साळवी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, बंदर निरीक्षक पाटील आदी हजर होते.

मंत्री चालले एक किलोमीटर
बुरोंडी बंदराकडे जाणारा रस्ता अतिशय चिंचोळा आहे. या रस्त्यावरून केवळ एकच गाडी जाऊ शकते. त्यामुळे चव्हाण यांनी बुरोंडी एसटी पिकअप शेडजवळच आपली सरकारी गाडी ठेवली व ते कार्यकर्ते आणि सरकारी अधिकाऱ्यांसमवेत एक किलोमीटर अंतर चालत गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com