पोलिस ठाण्याच्या जागेत पंप?

अमोल टेंबकर
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

सावंतवाडी  -तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आल्यानंतर ऐतिहासिक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत कर्मचारी नाराज असून ही इमारत पाडू नये, अशी दबक्‍या आवाजात चर्चा सुरू आहे.

सावंतवाडी  -तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आल्यानंतर ऐतिहासिक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत कर्मचारी नाराज असून ही इमारत पाडू नये, अशी दबक्‍या आवाजात चर्चा सुरू आहे.

येथील पोलिस ठाण्याची इमारत उद्यापासून (ता. १५) मोकळा श्‍वास घेणार आहे. त्या ठिकाणी असलेले कार्यालय आता नव्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीत हे कार्यालय जाणार आहे; परंतु जुन्या इमारतीबाबत गृह विभागाकडून नकारात्मक विचार करण्यात आला आहे.

काही कर्मचाऱ्यांनी खासगीत दिलेल्या माहितीनुसार नव्या इमारतीच्या उद्‌घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा मानस आहे. सद्यस्थितीत ही जागा गृहविभागाच्या ताब्यात आहे. ही जागा मुंबई गोवा महामार्गाला लागून आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अनेकांचे डोळे आहेत. अशा परिस्थिती पेट्रोलपंप उभारून ती जागा खासगी विकासकाच्या गळ्यात घालण्याचा डाव सुरू असल्याचे चित्र आहे. यात संबंधित जागेवर गृहविभागाच्या वतीने पेट्रोलपंप उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पोलिस ठाणे आणि कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या पेट्रोल डिझेलसह अन्य लोकांना त्याचा फायदा देण्यात येणार आहे. या जागेबरोबर आंबोली येथे असलेल्या एक जागेचा विचार करण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे.

पोलिस ठाण्याची इमारत ऐतिहासिक 
येथील पोलिस ठाण्याची सद्यस्थितीत वापरात असलेल्या इमारतीला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. ५ मार्च १८९९ च्या पूर्वी ही इमारत उभारण्यात आली. लोकल इन्फन्ट्री कॉप्स लाईन असा उल्लेख आहे.

तत्कालीन पोलिटिकल सुप्रिटेंडट ऑफ दी सावंतवाडी स्टेटचे राजे बहादूर हर हायनेस रघुनाथराव सावंत भोंसले यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन झाले होते. तत्कालीन परिस्थिती याचा वापर इंग्रजांसह सावंतवाडीच्या राजघराण्याने केला होता. सैनिकांसह घोड्याची पाग त्या ठिकाणी होती. पुढे जिल्ह्याचे पोलिस मुख्यालय त्या ठिकाणी होते. त्यानंतर मुख्यालय ओरोसमध्ये हलविल्यानंतर त्या ठिकाणी पोलिस स्टेशन सुरू करण्यात आले.

अंतिम काही नाही 
याबाबत पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अजून अद्याप अंतिम निर्यण नाही, असे सांगितले. त्यामुळे आपण अधिक काही सांगू शकत नाही, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

आर्मेचरीचे म्युझियची अपेक्षा
याबाबत एक पोलिस कर्मचारी म्हणाले, ‘‘त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आर्मेचरी हे इंग्रजांच्या काळात त्यांच्या बनावटीनुसार बांधण्यात आले आहे. त्यावर वीज रोखण्यासाठी त्यावेळी पंचधातू वापरून व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच आतील बनावट सुद्धा वेगळी आहे. त्यामुळे या आर्मेचरीचे म्युझियम म्हणून जतन होणे गरजेचे आहे.’’

इमारत पाडण्यास विरोध 
याबाबत खासगीत बोलताना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. संस्थानकालीन इमारत असताना ही इमारत ऐतिहासिक वास्तूत घेतली गेली नाही हे दुर्दैव आहे. तरीही आता जुनी इमारत म्हणून त्याचे जतन होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती जुनी म्हटली जाणारी इमारत सुस्थितीत आहे. त्यामुळे ती न पाडता त्या ठिकाणी किमान पोलिसांसाठी रेस्टहाउस उभारण्यात यावे.