रेल्‍वेस ‘तुतारी’ नामकरणाने कोकणच्या प्रतिभेचा सन्मान

भूषण आरोसकर 
बुधवार, 31 मे 2017

सावंतवाडी - राज्यराणी एक्स्प्रेसचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर येथे नामकरण झाले. ‘तुतारी एक्स्प्रेस’ ही कवितेच्या शीर्षकाच्या नावाने धावणारी देशातील दुसरी एक्स्प्रेस ठरली आहे. राज्यात असा मान कोकण रेल्वेला प्राप्त झाल्यामुळे कोकण रेल्वेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसुत कट्ट्यावरची तुतारी व कोकण रेल्वेची तुतारी कवी केशवसुतांच्या स्मृती जपण्यात एकमेकांची वेगळी सांगड घालून देत असल्याचे दिसून येत आहे.

सावंतवाडी - राज्यराणी एक्स्प्रेसचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर येथे नामकरण झाले. ‘तुतारी एक्स्प्रेस’ ही कवितेच्या शीर्षकाच्या नावाने धावणारी देशातील दुसरी एक्स्प्रेस ठरली आहे. राज्यात असा मान कोकण रेल्वेला प्राप्त झाल्यामुळे कोकण रेल्वेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसुत कट्ट्यावरची तुतारी व कोकण रेल्वेची तुतारी कवी केशवसुतांच्या स्मृती जपण्यात एकमेकांची वेगळी सांगड घालून देत असल्याचे दिसून येत आहे.

देशातील सर्वच भागात रेल्वेमार्गाचे जाळे पसरले आहे. त्यात खडतर डोंगराळ भागातुन अनेक आंदोलने व लढ्यानंतर कोकण रेल्वेचे स्वप्न पुर्ण झाले. खरे पाहिले तर कोकण रेल्वेला एक विकासाच्या क्रांतीचे मोठे पाऊल समजले जाते. जे कोकणच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण योगदानच नसून कोकणातील पर्यटनाला वाव देण्यासाठीही एक महत्वाची बाजू आहे. अर्थातच यासाठी अनेकांचे योगदान लाभले होते. 

दरम्यान कोकणात वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, श्रीपाद पेंडसे, मधु मंगेश कर्णिक, वसंत सावंत, विद्याधर भागवत, हरीहर आठलेकर असे कित्येक एकापेक्षा एक थोर साहित्यिक, कवी, लेखक होवून गेले. काही आजही आहेत. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कोकण रेल्वे आणि साहित्यांची उत्तम सांगड घालण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेसचे तुतारी एक्स्प्रेसमध्ये नामकरण होणे यासारखी मोठी बाब असूच शकत नाही. कवी केशवसुताच्या नावाने एक्‍सप्रेस असावी असा अशी मागणी ८ वर्षापूर्वीच मराठी साहित्य कोकण परिषदेतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाला केली होती. आता ८ वर्षानंतर हे स्वप्न सत्यात उतरले आणि (ता.२२) केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. केशवसूतांची एक तुतारी द्या मज आणून फुंकिन जी मी स्वप्राणाने या कवितेच्या शिर्षकाची आठवण तुतारी एक्‍सप्रेसच्या नावाने झाली खरी परंतु कवितेच्या भावार्थाप्रमाणे आता कोकण रेल्वे मार्गावर नवीन परिवर्तन होणार आहे. यात नव्या संकल्पना असतील हे नक्की. तुतारी या कवितेतून केशवसूतांनी आपण एका मोठ्या आव्हानासाठी सज्ज झालो असून वाटेत येणाऱ्या संघर्ष व युद्धाला सामोरे जाण्यास पूर्ण तयार आहे. नव्या परिवर्तनाचे एक रणशिंग या तुतारीच्या माध्यमातुन फुंकले आहे. याद्वारे तुम्हीही संपुर्ण गगन भेदून टाकणारे असे कर्तव्य पार पाडा असा संदेश कवितेच्या माध्यमातुन केशवसूतांनी केला होता. कोकण रेल्वेमार्गावर नुकतीच सुपरफास्ट तेजस धावली दरम्यान मुंबई येथे त्याच्यावर दगडफेकही झाली. कोकण रेल्वेत निरनिराळे बदल घडविण्यात असतानाच अशाच प्रकारची आव्हाने समोर ठाकली असल्याची येथे स्पष्ट दिसून येत आहे. यासर्वाला सामोरे जावून आणखी काही नवीन क्रांती घडविण्यास कोकण रेल्वे सज्ज असल्याचे ‘तुतारी’च्या शिर्षकाने समजते. तुतारी हे कवी केशवसूतांच्या कवितेचे नाव राज्यराणीला देण्यात यावेत ही मागणी कोकण मराठी साहित्य परिाषदेचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांनी केली होती. दरम्यान मालगुंडला केशवसुताच्या जन्मस्थानी मालगुंड येथे कोमसापच्या झालेल्या एका मेळाव्यात तशी घोषणाही करण्यात आली होती. तसेच नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या श्रीराम वाचन मंदीर येथे (कै.) जयानंद मठकर स्मृती पुरस्कारावेळीही श्री कर्णिक यांनी आपण याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या ही बाब ध्यानात आणण्याचेही ते बोलले होते. २२ ला दादर येथे झालेल्या कार्यक्रमात ते सत्यातही उतरलेही. मळगाव येथील टर्मिनल्सही विकासाच्या दृष्टीने उभारी घेत असल्यामूळे बदलत्या टर्मिनल्सवर धावणारी तुतारी सर्वासाठी मोती तलावाच्या केशवसूत कट्याची आठवण करुन देत कविता व रेल्वेची एक आगळी वेगळी सांगड घालून देत आहे. 

सावंतवाडी केशवसुत कट्ट्यावरची तुतारी
केशवसुत कट्ट्यावरची मोती तलावाच्या मध्यभागी असलेली ही तुतारी सावंतवाडीतील केशवसुतांची आठवण करून देते. या तुतारीचा इतिहास केशवसुतांच्या सावंतवाडीत असतानाच्या अनेक घटना कथन करतात. त्यानंतर पूर्ण प्रवास करून आराम करण्यासाठी याच रेल्वेस्टेशनवर थांबणारी तुतारी एक्स्प्रेसही सावंतवाडीतील त्याच आठवणींना उजाळा देण्यात महत्त्वाच्या ठरत आहेत.

‘ती’ तुतारी आम्हालाही हवी
कोकण रेल्वेचे राज्यातील शेवटचे टोक मडुरा हे आहे. सावंतवाडी दिवा पॅसेंजर व मडगाव रत्नागिरी पॅसेंजर शिवाय कोणत्याच रेल्वे गाड्या या रेल्वेमार्गावर थांबत नाही. दरम्यान निदान राज्यराणी एक्स्प्रेस मडुऱ्यात येऊन पुन्हा सावंतवाडी येथे जावी अशी मोठी मागणी दशक्रोशीतील ग्रामस्थांची आहे. तुतारी एक्स्प्रेस या नामकरणानंतर तरी तसे होण्याची प्रतीक्षा कायम आहे.