जिल्ह्यात ३८३ रास्त दुकाने ‘बायोमेट्रिक’

जिल्ह्यात ३८३ रास्त दुकाने ‘बायोमेट्रिक’

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या रास्तदराच्या धान्यसाठ्याचे वितरण प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योग्यरीतीने व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारमान्य धान्य दुकानात बायोमेट्रिक मशीन पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४३० धान्य दुकानांपैकी ३८३ धान्य दुकानात बायोमेट्रिक मशीन कार्यरत झाली आहेत. ४७ गावांमध्ये  नेटवर्किंगची समस्या असल्याची माहिती आजच्या लोकशाही दिनात जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांनी दिली.

जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी  यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जिल्हा पोलिस उपअधीक्षक संध्या गावडे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे इन्स्पेक्‍टर सौरभ पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अनामिका जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्याने सरकारमान्य धान्यपुरवठा बायोमेिट्रक प्रणालीच्या माध्यमातून वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ४३० धान्यपुरवठा दुकानामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे; मात्र आतापर्यंत ३८३ दुकानांमध्ये यंत्रणा कार्यरत केली. ४७ गावांमध्ये नेटवर्किंगची समस्या असल्याने अद्यापही बायोमेट्रिक प्रणालीचा वापर होत नाही, अशी माहिती राऊत यांनी दिली. जिल्ह्यात सद्य:स्थितीत धान्याचा तुटवडा नाही. धान्य दुकानदारांचा संप मिटला आहे त्यामुळे गणेशोत्सवासाठीच्या धान्याची उचल होईल व लाभार्थ्यांना लाभ मिळेल असेही या वेळी स्पष्ट केले.

आजच्या  लोकशाही दिनात एकूण ७ तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये जिल्हा परिषद ५, महसूल विभाग १, महाराष्ट्र बॅंक १ आदी अर्जांचा समावेश आहे, अशी माहिती दिली. गणेशोत्सव कालावधीत येणाऱ्या चाकरमान्यांची रिक्षा व्यावसायिकांकडून लूट होऊ नये यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे विशेष पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे. ठराविक अंतरासाठी सद्य:स्थितीत निश्‍चित असलेले रिक्षा भाडे गणेश चतुर्थी कालावधीतही तेवढेच घ्यावे. चाकरमान्यांकडून दामदुप्पट भाडे आकारल्याची तक्रार आल्यास कारवाई  करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी सौरभ पाटील यांनी दिली, तर गणेशोत्सव कालावधीत विशेष पथके कार्यान्वित करण्यात येणार  असल्याचे सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एस. पी. मैदानात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांना जोर चढला आहे; मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या विशेष पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे मारुन अवैध धंदेवाल्यांची झोप उडविली आहे. अशी कारवाई स्थानिक पोलिसांकडूनही होऊ शकली असती; परंतु तसे होत नसल्याने प्रत्यक्षात ‘एस.पी.’ ना कारवाईसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. याबाबत विचारले असता जिल्हा पोलिस उपअधीक्षक संध्या गावडे यांनी जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एस.पी.ना रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे स्पष्ट करत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची पाठराखण केली. यातून स्थानिक अधिकाऱ्यांची ‘अकार्यक्षमता’ समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com