जिल्ह्यात पावसामुळे ३४ लाखांची हानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात आतापर्यंतच्या पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मिळून ३३ लाख ९८ हजार २७६ रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६० घरे, १६ गोठे, ३ सार्वजनिक मालमत्ता बाधीत झाल्या आहेत. या नुकसानीपोटी प्रशासनाकडून केवळ ४८ हजार इतक्‍या सानुग्रह अनुदानाचे वाटप केले आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात हाहाकार माजविला अाहे. नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. रस्त्यावर झाडे पडून अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या घटना घडल्या. 

आज सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी १४३७.८३ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत सरासरी ३५.३७ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी सरासरी ५०० मिलीमीटर एवढा पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी १७ जुलैपर्यंत सरासरी १९०० मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. 

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर येणाऱ्या पावसामुळे नुकसानीचे प्रमाण मात्र वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६० घरे, १६ गोठे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मिळून ३४ लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६० घरांचे १५ लाख २४ हजार ३७६ रुपये, १६ गोठ्यांचे ३ लाख ३ हजार ९०० रुपयांचे तर सार्वजनिक मालमत्तेचे १३ लाखांचे नुकसान झाले आहे. 

या व्यतिरिक्त ५ जनावरे मृत पावल्याने २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्‍यात नैसर्गिक आपत्तीमुळे १ व्यक्ती मृत पावल्याची नोंद झाली आहे; मात्र जिल्ह्यात आतापर्यंत तीन ते चार व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र याबाबतची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झालेली नसल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.