जि. प. सदस्याच्या घरात चोराचा डल्ला

जि. प. सदस्याच्या घरात चोराचा डल्ला

कणकवली - काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या सावी लोके यांच्या जानवली महाजनीनगरातील चिंतामणी विहार अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आज दुपारी अवघ्या २० मिनिटांच्या अवधीत चोरट्याने घरात प्रवेश करून तब्बल एक लाखाचा ऐवज लांबविला. दिवसाढवळ्या भरवस्तीत झालेल्या चोरीच्या दुसऱ्या घटनेमुळे जिल्हा पोलिस यंत्रणेचे अपयश उजेडात आले आहे. साकेडीत दिवसा घरातील दागिने चोरी झाल्यानंतरची ही दुसरी घटना आहे. घटनास्थळी श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करूनही संशयित आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. 

कणकवली शहरापासून हाकेच्या अंतरावर जानवली नदीलगत महाजनीनगर वसले आहे. या नगरीत छोटे-मोठे बंगले तर काही अपार्टमेंटही आहेत.

वस्ती तशी गजबजलेली आहे. या वस्तीतील चिंतामणी विहार या इमारतीच्या ए विंगच्या तिसऱ्या मजल्यावर सावी लोके (वय ३८) या राहतात; तर त्यांचा भाऊ बी विंग मध्ये राहतात. आज दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी आपल्या खोलीला कुलूप लावून घरात शिजलेले मासे भावाच्या घरी देण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर केवळ २० मिनिटातच त्या घरी परतल्या असता खोलीच्या पुढील दरवाजाचा कडी कोयंडा हत्याराने कापून संशयितांनी आत प्रवेश केलेला होता. कपाटातील कपडे बाहेर काढून आतील रोख अकराशे रुपये तर चार तोळ्याचे ८० हजाराचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची सहा हजाराची अंगठी, तसेच दोन ग्रॅमच्या चार हजार रुपये किमतीच्या चार अंगठ्या, दोन ग्रॅमची चार हजार रुपये किमतीची कुडी आणि हातातील दोन हजार रुपयांचे घड्याळ मिळून एक लाख ९ हजार १०० रुपये किमतीचे दागिने लांबविले आहेत. हा प्रकार पाहून श्रीमती लोके यांना धक्का बसला. त्यांनी आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर येथील पोलिस ठाण्यात खबर दिली. घटनास्थळी कणकवली पोलिस निरीक्षक शशिकांत खोत तसेच जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक दाखल झाले. श्‍वान पथकालाही तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. परंतु पोलिसांना संशयित आरोपी अद्याप सापडू शकलेला नाही. 

जानवलीतील दुसरी घटना 
जानवली येथे महाजनीनगरात आज दिवसा चोरी झाली. अशाच पद्धतीने एप्रिलमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर चोरी झाली होती. त्यामुळे संशयित आरोपी या परिसरात वास्तव्याला असावा अशी दाट शक्‍यता आहे. आजच्या घटनेत संशयित आरोपीने श्रीमती लोके यांच्यावर पाळत ठेवली असावी असा संशय आहे.

पोलिस यंत्रणा हतबल 
कणकवली शहरात एका हॉटेलच्या छपराचे पत्रे काढून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. त्यानंतर साकेडी गावात भर दिवसा घरफोडी होऊन दोन लाखाचे दागिने चोरीस गेले. त्याच दिवशी शहरातील वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लांबविण्यात आले. पोलिस असल्याची बतावणी करून हा ऐवज लुटला गेला. सातत्याने घडणाऱ्या या चोऱ्यामुळे पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाळा सुरू होऊन १५ दिवस लोटले असतानाच चोरट्यांनी संधी साधायला सुरुवात केली आहे. 

नागरिकांनी जागरूक राहावे  
शहर आणि परिसरात टोलेजंग इमारती तसेच निवासी बंगले बांधण्यात आले आहेत. काही ठिकाणी विरळ वस्ती तर काही ठिकाणी दाट वस्ती आहे. परंतु घर बंद करून जाणाऱ्या नागरीकांनी शेजाऱ्याला आपण बाहेर जात असल्याची कल्पना देणे आवश्‍यक आहे. गेल्या काही वर्षात परराज्यातून अनेक लोक विविध वस्तू विक्रीच्या बहाण्याने शहरी भागात येत आहेत. काहीजण वस्ती करू लागले आहेत. भाडेकरूंना खोली देत असताना अशा व्यक्तींकडून आधारकार्डची झेरॉक्‍स घेतलीच पाहिजे. तसेच आपल्या वस्तीत किंवा नगरात ज्या व्यक्ती अनोळखी म्हणून फिरत आहेत अशांची चौकशी करावी. किंबहुना संशयित व्यक्तींचे फोटो मोबाईलमध्ये काढून घ्यावेत इतकी जागरूकता प्रत्येक नागरिकांनी ठेवली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com