तिलारीचे रेस्ट हाऊस कोसळतेय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

दोडामार्ग - तालुक्‍यात एकमेव असलेले तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे विश्रामगृह (रेस्ट हाऊस) दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने कोसळत आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शासकीय क्षेत्रातील अनेकांच्या बैठकांचे साक्षीदार असलेले विश्रामगृह शासकीय अनास्थेमुळे कोसळतांना पाहून सर्वांनाच गलबलून येत आहे.

दोडामार्ग - तालुक्‍यात एकमेव असलेले तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे विश्रामगृह (रेस्ट हाऊस) दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने कोसळत आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शासकीय क्षेत्रातील अनेकांच्या बैठकांचे साक्षीदार असलेले विश्रामगृह शासकीय अनास्थेमुळे कोसळतांना पाहून सर्वांनाच गलबलून येत आहे.

तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या निर्मिती दरम्यान, तिलारीत विश्रामगृह बांधण्यात आले. तिलारी शिर्षकामे विभाग क्रमांक एक व अन्य कार्यालये तिलारीत म्हणजे कोनाळकट्ट्यात उभी राहिली, तेव्हापासून विश्रामगृह अनेकांच्या वास्तव्याचे साक्षीदार आहे. राज्यातले मुख्यमंत्री, अनेक मंत्री, राज्याचे वेगवेगळ्या विभागाचे सचिव, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या विश्रामगृहावर संबंधितांशी चर्चा केल्यात, पत्रकार परिषदा झाल्या. विविध विकासकामांबाबत आणि लोकहितकारक निर्णय तेथे झाले. तिलारी प्रकल्पग्रस्त, हत्तीमुळे त्रस्त शेतकरी बांधव या सर्वांचे प्रश्‍न याच विश्रामगृहावर ऐकून घेतले गेले आणि सोडविण्याचे प्रयत्न झाले. त्याच विश्रामगृहाची आज सगळीकडून पडझड सुरू आहे. अनेक कक्षांमध्ये गळती लागली आहे. कॉन्फरन्स हॉल आणि विशेष अतिथींच्या बैठकिच्या खोल्याही गळतीमुळे धोकादायक बनल्या आहेत. एकेकाळी दिमाखात उभ्या असलेल्या देखण्या विश्रामगृहाला अवकळा आली आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी विश्रामगृहाची पाहणी केली. त्यानंतर तिलारी शिर्षकामे विभाग क्रमांक दोनचे उपविभागीय अभियंता दिनकर चव्हाण यांची भेट घेऊन विश्रामगृहाच्या पडझडीबाबत माहिती घेतली. त्यावेळी श्री. चव्हाण यांनी पडझड आणि दुरुस्तीची गरज याबाबत आपण वरिष्ठ कार्यालयांना वेळोवेळी कळविले आहे; मात्र त्यांच्याकडून उत्तरच येत नाही, त्याला आम्ही काय करायचे असे सांगून आपली हतबलता व्यक्त केली. त्यावेळी धुरी यांनी आपण केलेल्या पत्रव्यवहाराची एक प्रत मला द्या, पालकमंत्री तथा वित्त व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विश्रामगृहाचा प्रश्‍न सोडवू. तालुक्‍यातील एकमेव विश्रामगृह सुस्थितीत व सुरू रहायलाच हवे असा आमचा आग्रह आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करीन, असे सांगितले.

असाही विरोधाभास
एकिकडे तिलारीचे अधिकारी आपल्या कार्यालयावर अनाठायी लाखो रुपये खर्च करताहेत. तर दुसरीकडे जनसामान्यांच्या प्रश्‍नांना जिथे वाचा फुटते ते विश्रामगृह निधीअभावी कोसळत आहे हा विरोधाभास नक्कीच विचार करायला लावणारा आहे.