सुसाट कोकण रेल्वेला थांब्यांचे वावडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

सावंतवाडी - कोकणातून रेल्वे केवळ धावते, थांबत नाही हे सत्य पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत साधार पोचवलेच नाही, तर पटवूनही दिले. याची दखल घेत श्री. प्रभू यांनी या गाड्यांच्या थांब्याशी संबंधित रेल्वेच्या सर्व विभागांना शक्‍य तितके बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

सावंतवाडी - कोकणातून रेल्वे केवळ धावते, थांबत नाही हे सत्य पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत साधार पोचवलेच नाही, तर पटवूनही दिले. याची दखल घेत श्री. प्रभू यांनी या गाड्यांच्या थांब्याशी संबंधित रेल्वेच्या सर्व विभागांना शक्‍य तितके बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोकणात विकास यावा या हेतूने प्रयत्नांची पराकाष्टा करून रेल्वे आणण्यात आली; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कोकणची मुंबईशी नाळ जुळलेली आहे. एकट्या सिंधुदुर्गचा विचार केल्यास याची लोकसंख्या ९ लाखांच्या पटीत आहे; मात्र याच्या पाच पट म्हणजे ४० ते ४५ लाख सिंधुदुर्गवासीय मुंबई, पुणे, डहाणू-ठाणे या भागात नोकरीनिमित्त राहतात. त्यांचा सणासुदीला, कौटुंबिक कारणाने गावाशी सतत संपर्क असतो. हा जिल्हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे. इतके असूनही एक्‍स्प्रेस रेल्वेंना येथे एखादाच थांबा दिला जातो. काही गाड्यांना तर थांबाच नाही. याबाबतच्या मागण्या केल्यावर एक्‍स्प्रेस गाड्यांना जास्त थांबे देता येत नाहीत, असे सांगितले जाते. या मार्गावर कोकण रेल्वेच्या मोजक्‍या गाड्या आहेत. इतर बहुसंख्य एक्‍स्प्रेस गाड्या रेल्वेच्या इतर विभागांकडून चालविल्या जातात. त्यामुळे कोकण रेल्वेचे यावर नियंत्रण नसते.

या मार्गावरून रेल्वे सोडल्यामुळे कर्नाटक, केरळ आदी भागांतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा बराच वेळ आणि अंतर वाचते. अशा वेळी कोकणात मोजके थांबे देऊन सोपस्कार पूर्ण केला जातो.

श्री. सावंत यांनी या समस्येच्या मुळाशी जात अभ्यास केला असता समोर आलेले वास्तव मात्र वेगळेच होते. कोकणात दोन-तीन थांबे असणाऱ्या गाड्यांना कर्नाटक, केरळमध्ये मात्र सात-आठ थांबे दिले जातात. हा भेदभाव त्यांनी साधार समोर आणला.

कोकणाला दुजाभाव
गाड्यांबाबतचे वास्तव असे ः
* मंगळूर सुपरफास्ट ही गाडी पनवेल ते मडगाव या ६९६ किलोमीटर अंतरावर फक्त रत्नागिरी व कणकवली अशा दोन ठिकाणीच थांबते; मात्र मडगाव ते मंगळूर या ४०८ किलोमीटर अंतरावर ती तब्बल ७ स्टेशन घेते.

* मंगला एक्‍स्प्रेस ही कोकण रेल्वेमार्गावरील एकमेव मध्य रेल्वेमार्गे जाणारी गाडी पनवेल ते मडगाव या ६९७ किलोमीटर मार्गावर चिपळूण, रत्नागिरी, कणकवली अशा तीनच ठिकाणी थांबते.

* नेत्रावती एक्‍स्प्रेस ही एर्नाकुलम ते त्रिवेंद्रम या २०६ किलोमीटर अंतरावर ८ ठिकाणी, मंगळूर ते एर्नाकुलम दरम्यान ४१९ किलोमीटर अंतरावर १६ ठिकाणी, थिवीम ते मंगळूरदरम्यान ४९४ किलोमीटरवर ११ ठिकाणी आणि पनवेल ते थिवीम या कोकणातून जाणाऱ्या ६३३ किलोमीटरवर फक्त तीनच ठिकाणी थांबते.

* मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस पनवेल ते मडगावदरम्यान फक्त पाच ठिकाणी थांबते. पण पुढे मडगाव ते मंगळूर या ३९१ किलोमीटर मार्गावर तब्बल १४ ठिकाणी थांबते.

कोकण रेल्वे मार्गावर सुटणाऱ्या जादा गाड्यांना प्रीमियम भाडे लावले जाते. वास्तविक या मार्गावर आधीच ४० टक्के जादा भाडे असल्याने प्रीमियमचा पॅटर्न बदलायला हवा. जनरल डब्यांची संख्याही वाढवायला हवी. हे सर्व प्रश्‍न रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्यानंतर त्यांनी तातडीने यावर शक्‍य तितके बदल करण्याची ग्वाही दिली. यातून निश्‍चित काही तरी मार्ग निघेल, याची खात्री आहे.
- डी. के. सावंत,    अध्यक्ष, द्वारकाकृष्ण टुरिझम पर्यटन सहकारी सोसायटी

रेल्वेमंत्र्यांकडून दखल
कोकणात गाड्यांना थांबे नाहीत याची ओरड आतापर्यंत अनेकदा झाली; मात्र त्यावर निर्णय झाला नाही. श्री. सावंत यांनी सर्व मुद्दे अभ्यासपूर्णरीत्या दिल्लीत जाऊन थेट रेल्वेमंत्र्यांसमोर मांडले. त्यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाचे सचिव (पी. एस.) डॉ. विजय पिंगळे यांना याचा पाठपुरावा करण्याची सूचना केली. या सर्व गाड्यांबाबतचे निर्णय त्या त्या रेल्वे विभागाच्या हद्दीतून धावतात याच्याशी संबंधित असतात. यामुळे सर्व विभागांना आवश्‍यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली. यावर कामही सुरू झाले आहे.

काय आहेत मागण्या?
 मंगळूर एक्‍स्प्रेस किमान सावंतवाडीत थांबवावी.
 मंगला एक्‍स्प्रेस कणकवलीबरोबर सावंतवाडी टर्मिनसवरही थांबवावी
 मत्स्यगंधा आणि नेत्रावतीला कणकवली, सावंतवाडी थांबे मिळावेत.
 गरीब रथ एक्‍स्प्रेस शोराणूरच्या पुढे रिकामी असते. ही गाडी जाता-येता ५ तास पुढे किंवा मागे केल्यास मडगाव-मुंबई दरम्यान प्रवाशांना फायदा
 राज्यराणी एक्‍स्प्रेसला होणारा उशीर टाळण्यासाठी तिची वेळ बदलून दादरला ती पहाटे पाचपर्यंत पोचावी अशी करावी. या गाडीस चार स्लीपर व चार जनरल कोच वाढवावे.
 डबलडेकर २ तास उशिरा सोडावी
 जनशताब्दीला सावंतवाडी थांबा मिळावा.
 सावंतवाडी स्थानकावरील आरक्षण खिडकी दुपारनंतरही सुरू ठेवावी.

Web Title: konkan railway