कोकण रेल्वेत अत्याधुनिक सुविधा देणार - सुरेश प्रभू

कोकण रेल्वेत अत्याधुनिक सुविधा देणार - सुरेश प्रभू

कुडाळ - ""कोकण रेल्वेच्या माध्यमातून येथील पर्यटन व उद्योग जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोकण रेल्वेत भविष्यात अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच देशाच्या सर्वांगीण विकासात रेल्वेचे मोठे योगदान असणार आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज विविध सुविधांच्या उद्‌घाटनप्रसंगी केले. कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वाय-फाय सेवेचा प्रारंभही आज करण्यात आला. 

कोकण रेल्वे मार्गावर 28 ठिकाणी आज वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली. कुडाळ व चिपळूण या रेल्वेस्थानकात आधुनिक सुविधा देण्यात आल्या. त्याचा प्रारंभ श्री. प्रभू यांच्या हस्ते येथील रेल्वे स्टेशन येथे झाला. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली, कोकण रेल्वेच्या व्यवस्थापक संजय गुप्ता, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, सभापती राजन जाधव, क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम, शाम तोडकर, नगरसेवक अभय शिरसाट, रेल्वे कर्मचारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, प्रवासी आदी उपस्थित होते. 

श्री. प्रभू म्हणाले, ""कोकण रेल्वेच्या माध्यमातून येथील लोकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही काम करीत आहोत. देशाच्या सर्वांगीण विकासात कोकण रेल्वेचे फार मोठे योगदान आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून येथील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी जगाच्या नकाशावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज या मार्गावर 28 ठिकाणी वाय-फाय सेवा सुरू झाली आहे. हे कोकण रेल्वेचे देशातील वाय-फायचे पहिले पाऊल आहे. कुडाळ, चिपळूण ही स्थानके अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण झाली आहेत. लवकरच अन्य स्थानकांवर अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडियाला डिजिटल रेलचा स्पर्श असणार आहे. मोदी यांच्या देशाला बदलण्याच्या मोठ्या योगदानात रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर दुहेरीकरण, विद्युतीकरणाला सुरवात झाली आहे. कऱ्हाड, चिपळूण तसेच कोल्हापूर-वैभववाडी जोडण्यासाठी आम्ही प्रकल्प हाती घेतले आहेत. कोकण पश्‍चिमेस जोडले जाईल. रेल्वेच्या माध्यमातून चिपळूण-लोटे येथील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. ज्या काही अडचणी आहेत त्याबाबत श्री. गुप्ता यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. सावंतवाडी टर्मिनस सुरू झाल्यानंतर विविध सुविधा देण्यात येतील. देशातील पहिली "तेजस एक्‍स्प्रेस' उद्या या मार्गावरून धावणार आहे. 16 जूनला महाराजा एक्‍स्प्रेस धावणार आहे. ही सर्व कोकण रेल्वेच्या प्रगतीची लक्षणे आहेत. मालवण, वेंगुर्ले, देवगड या किनारपट्टीतील भागात पीआरए सिस्टिम सुरू करण्यात आली आहे.'' 

खासदार श्री. राऊत म्हणाले, ""श्री. प्रभू यांच्या माध्यमातून कोकण रेल्वेचा झपाट्याने कायापालट होत आहे. आधुनिक सुविधा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. भविष्यात कुडाळ रेल्वे स्टेशन येथे असणारा ओव्हरब्रीज वाहतुकीच्या दृष्टीने कसा सुलभ होईल, या ब्रीजने सरंबळ-कुडाळ गाव अधिक जवळ कसे जोडले जाईल या दृष्टीने प्रयत्न करावेत.'' 

श्री. गुप्ता यांनी प्रास्ताविक करताना वाय-फाय सेवेबाबत माहिती दिली. कोकण रेल्वेचे शाम तोडकर यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब निकम यांनी आभार मानले. 

पाच वर्षांत प्रश्‍न मार्गी लागतील 
श्री. प्रभू यांनी पत्रकार परिषदेत गेल्या तीन वर्षांतील कोकण रेल्वेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, ""कोकण रेल्वेच्या सर्वांगीण विकासात नवनवे उपक्रम राबवायचे आहेत. येत्या पाच वर्षांत कोकण रेल्वेचे चित्र बदलेल. अनेक प्रश्‍न मार्गी लावण्याबरोबरच नवीन रेल्वेचा प्रश्‍नही हाताळणार आहोत. दिवासारखी अन्य पॅसेंजर रेल्वे सेवा देण्याचाही प्रयत्न आहे.'' 

प्रभू म्हणाले... 
* कोकण रेल्वेच्या माध्यमातून पर्यटन, उद्योग जगाच्या नकाशावर आणणार 
* भविष्यात डिजिटल इंडियाला डिजिटल रेलचा स्पर्श 
* कऱ्हाड, चिपळूण तसेच कोल्हापूर-वैभववाडी जोडण्यासाठी प्रकल्प 
* कोकण पश्‍चिमेस जोडले जाईल 
* चिपळूण-लोटे येथील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न 
* सावंतवाडी टर्मिनस झाल्यानंतर विविध सुविधा 
* देशातील पहिली "तेजस एक्‍स्प्रेस' आज धावणार 
* 16 जूनला "महाराजा एक्‍स्प्रेस' धावणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com