पर्यटनाला पुन्हा भरते

अलिबाग : नागाव किनाऱ्यावर बनाना राईडची मौज घेताना पर्यटक. (छायाचित्र - समीर मालोदे)
अलिबाग : नागाव किनाऱ्यावर बनाना राईडची मौज घेताना पर्यटक. (छायाचित्र - समीर मालोदे)

अलिबाग - नाताळचा सण दोन दिवसांवर आला आहे. नाताळ व नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दिली आहे. नोटाबंदीनंतर मोठा फटका बसलेला पर्यटन व्यवसाय हळूहळू सावरू लागला आहे. जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेज, लॉजची शनिवारपर्यंतची (ता.२४) बुकिंग फुल्ल झाली आहे. हॉटेल व्यवसाय तेजीत असला तरी पर्यटनपूरक इतर व्यवसाय अद्यापपर्यंत पूर्वपदावर आलेले नाहीत.

शनिवारपासून जिल्ह्यात पर्यटक दाखल होण्यास सुरुवात होईल. आठ दिवसांत जिल्ह्यात जवळपास दीड लाख पर्यटक दाखल होणार आहेत. त्यांनी हॉटेल, कॉटेज व लॉजमध्ये आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे. हॉटेल, लॉजिंगच्या जवळपास ८० टक्के खोल्या आरक्षित झाल्या आहेत.

नोटाबंदीनंतर जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या रोडावली होती. आता पर्यटन व्यवसायावरील अवकळा दूर होऊ लागली आहे.

हॉटेल, कॉटेजमध्ये पर्यटक दाखल होत असले, तरी इतर पर्यटनपूरक व्यवसाय अजूनही थंड आहेत. पर्यटकांकडून होणारी फुटकळ खरेदी मोठ्या प्रमाणावर थांबली आहे. त्यांना सुट्या पैशांची कमतरता भेडसावत आहे. एटीएममधून बहुतांश दोन हजारांच्या नोटा बाहेर पडत असल्याने सुटे पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. ऑनलाईन पेमेंट अजूनही छोट्या व्यावसायिकांच्या अंगळवळणी पडलेले नाही. त्यामुळे व्यवहार मंदावले आहेत.

महाड, पालीला गर्दी 
महाड तालुक्‍यात रायगड किल्ला; तसेच पाली, महड या अष्टविनायक स्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने अपेक्षित आहेत. नववर्षाचे स्वागत शिवाजीमहाराज; तसेच देवदर्शनाने करण्याचा अनेकांचा मानस असतो. त्यामुळे महाड, पाली व महड या ठिकाणी ३१ व १ जानेवारी या दोन दिवसांचे राहण्याचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे.

माथेरान फुल्ल  
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला नाताळ व नववर्षासाठी पर्यटकांनी पसंती दिली आहे. आठ दिवसांत येथे २५ हजारांहून अधिक पर्यटक दाखल होणार आहेत. हॉटेल व कॉटेजमध्ये ९० टक्के आगाऊ बुकिंग झाले आहे. या ठिकाणी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.

किनाऱ्यांना पसंती
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या समुद्रकिनारी असलेल्या तालुक्‍यांमध्ये नाताळसाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होणार आहेत. अलिबाग तालुक्‍यातील मांडवा, किहिम, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा येथील हॉटेल, कॉटेज फुल्ल झाले आहेत; तर मुरूड तालुक्‍यातील काशिद व मुरूड या समुद्रकिनारी ८० टक्के हॉटेल व कॉटेज फुल्ल झाले आहेत. श्रीवर्धनमधील दिवेआगर व हरिहरेश्वर येथील हॉटेल व कॉटेज जवळपास फुल्ल झाले आहेत.
 

नोटाबंदीनंतर येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता; मात्र आठ दिवसांपासून जिल्ह्यात पर्यटक पुन्हा दाखल होऊ लागले आहेत. २४ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक येणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांनीही त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी ठेवली आहे.
- उमेश केळकर, अध्यक्ष, हॉटेल, कॉटेज संघटना.

नाताळ व नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे. कॉटेज फुल्ल झाले आहे. कॅशलेस व्यवहाराचा परिणाम काही प्रमाणात जाणवत आहे; मात्र त्याची तीव्रता दूर झाली आहे. 
- प्रभाकर पडवळ,  मालक, मोरेश्वर कॉटेज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com