‘शोषित मुक्ती’मुळे कातकरी मुले शिक्षणाच्या प्रवाहात

अजय सावंत
मंगळवार, 11 जुलै 2017

वेताळ बांबर्डेत वसतिगृह - आमूलाग्र बदल; योगा, व्यायाम संस्काराचेही धडे 

कुडाळ - शोषित मुक्ती अभियानाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील कातकरी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. शिक्षणाबरोबरच योगा, व्यायाम संस्काराचे धडे ते वेताळबांबर्डे येथील वसतिगृहात घेत आहेत. 

वेताळ बांबर्डेत वसतिगृह - आमूलाग्र बदल; योगा, व्यायाम संस्काराचेही धडे 

कुडाळ - शोषित मुक्ती अभियानाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील कातकरी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. शिक्षणाबरोबरच योगा, व्यायाम संस्काराचे धडे ते वेताळबांबर्डे येथील वसतिगृहात घेत आहेत. 

शोषितमुक्ती अभियान ही संस्था गेली नऊ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील कातकरी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत. शिक्षणाचे धडे घेता घेता त्यांच्यावर संस्कार घडावेत, या उदात्त हेतूने अभियानाचे उदय आईर हे कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी श्री. आईर यांनी वेताळबांबर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते बबन कदम यांच्या सहकार्याने हुतात्मा नाग्या महादू निवासी वसतिगृह साकारले. श्री. कदम यांनी हे वसतीगृह मोफत दिले आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, कणकवली या पाच तालुक्‍यातील २१ मुले या वसतीगृहात आहेत. विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या सर्व मुलांना सोयीसुविधा दिल्या जातात. त्या सुद्धा सद्यस्थितीत अपुऱ्या पडत आहेत. या वसतीगृहाला भेट दिली असता मुलांचा टापटिपपणा पाहिल्यावर कोणीही ही मुले कातकरी समाजातील आहेत, असे म्हणणार नाहीत. गेल्या दोन वर्षापासून ही सर्व मुले कदमवाडी शाळेमध्ये शिक्षणाचे धडे घेत आहेत. या शाळेत मुख्याध्यापिका रश्‍मी नेरुरकर यांच्यासह त्यांच्या कर्मचारी वर्ग ज्ञानदानाचे चांगले काम करीत आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना क्रिडा क्षेत्रातील मार्गदर्शक मिळाले तर हे विद्यार्थी निश्‍चितच मैदानी खेळात आपले प्राविण्य दाखवतील. तालुका पातळीवर होणाऱ्या मैदानी स्पर्धात ही मुले अव्वल राहिली आहेत.

विविध सामाजिक संस्थांबरोबरच नाना देवधर यांचा सावली ट्रस्ट, लुपीन फाऊंडेशन डॉ. नवांगुळ, डॉ. रावराणे, डॉ. महेश लाडे, बबन कदम, डॉ. खानोलकर, शेखर सामंत यांचे सहकार्य लाभत असल्याचे श्री. आईर यांनी सांगितले. या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांच्या विविध योजनांसाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य आवश्‍यक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा असल्याचे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवले. अतिशय सुंदर हस्ताक्षर साकारणारे विद्यार्थीही या वसतिगृहात आहेत.

शासन उदासीन
आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. याबाबत सातत्याने याकडे लक्ष वेधूनही संबंधित विभाग विविध योजना कार्यान्वित करण्यास उदासिन दिसून येत आहे. गेली दोन वर्षे कातकरी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना त्यांना शासनस्तरावरून विविध योजनाचा लाभ मिळावा या दृष्टीने राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मदत मागितली; पण अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.