महावितरणवर केला हल्लाबोल

महावितरणवर केला हल्लाबोल

कुडाळ - वीज वितरणच्या अनागोंदी भोंगळ कारभाराबाबत आमसभेत लोकप्रतिनिधींसह लोकांनी हल्लाबोल केला. सातत्याने उद्‌भवणाऱ्या वीज प्रश्‍नाबाबत उर्जामंत्र्यांशी पाठपुरावा करणार, तालुक्‍याचे मुलभूत प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. मंत्री येणार म्हणून रस्त्याची डागडुजी या विषयावर भाजपा व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर आमदार नाईक यांनी या वादाला पूर्णविराम दिला.

कुडाळ तालुक्‍याची आमसभा आज येथील महालक्ष्मी सभागृहात आमदार श्री. नाईक यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, सभापती राजन जाधव, जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, अमरसेन सावंत, संजय पडते, आबा धडाम, काका कुडाळकर, विकास कुडाळकर, श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तहसीलदार अजय घोळवे, वासुदेव नाईक, अंकुश जाधव, डॉ. सुबोध माधव, मिलींद नाईक, जयभारत पालव, नूतन आईर, प्राजक्ता प्रभू, अनुप्रिती खोचरे, जान्हवी सावंत, तालुक्‍यातील सरपंच, ग्रामसेवक, नगरपंचायत नगरसेवक, विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सभेमध्ये विशेषतः वीज वितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. सातत्याने वीजेचा लपंडाव यामुळे ग्रामीण भागातील वीजेची यंत्रणासुद्धा नादुरुस्त झाली. सभा सुरु असतांनाच वीज खंडीत झाली.

त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी वितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत बोगस साहित्य वापरणे बंद करण्याचा इशारा दिला. मुंबई- गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम काल रात्री ९.३० वाजता सुरु होते. याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी विचारणा केली असता मंत्री येणार असल्याने काम करीत असल्याचे संबंधीत विभागाकडून सांगण्यात आले. या महामार्गावर पडलेल्या खड्डयामुळे अनेकांचे जीव जात आहेत. केवळ मंत्री येतात म्हणून खड्डे बुजविण्याचे काम संबंधित विभागाने करु नये. मंत्र्यांपेक्षा जनता महत्त्वाची असल्याचे सांगितले. यापुढे महामार्गावर अपघात झाल्यास काम करणाऱ्या संबंधितांर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तेर्सेबांबर्डे, झाराप येथील वीज मंडळासह, चौपदरीकरण प्रश्‍न, शेतकऱ्यांचे प्रश्‍न याबाबत लक्ष देण्याची मागणी रुपेश कानडे यांनी केली. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी राष्ट्रीयकृत बॅंका शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांना कर्ज देण्यासाठी सहकार्य करीत नाही.

शाखाधिकारी यांची कर्ज देण्याची मानसिकता नसते. याबाबत संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी आमदार श्री. नाईक यांच्याकडे केली. जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्ह्यात काजू, आंबा लागवडबाबत प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन प्रेरणा देण्याचे काम करणारे जिल्हाधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. कडावल येथील वीज वितरणचे विभागीय कार्यालय जांभवडे येथे आणणे, राष्ट्रीय पेयजल योजनेला केंद्र सरकारने मान्यता  दिली नाही. नव्याने ठराव करुन घ्यावी. मुख्यमंत्री सडकमधून जांभवडे भटवाडी ते वाघबीळ रस्ता ग्यावा, जी काही तलावे आहेत त्याचा सर्व्हे झाला. निविदा प्रक्रिया तत्काळ करण्याची मागणी त्यांनी केली.

स्मशानभूमीतील संरक्षक भिंतीसाठी जुने चिरे वापरण्यात आले याकडे नगरसेवक राकेश कांदे यांनी लक्ष वेधले तसेच आमदार श्री. नाईक यांनी पाण्यातील शेवाळ प्रश्‍नाकडे गांभिर्याने पाहिल्याबद्दल काँग्रेसचे जिल्हा सचिव व स्वीकृत नगरसेवक श्री. कांदे यांनी अभिनंदन केले. गटनेते ओंकार तेली यांनी नगरपंचायतीला कायमस्वरुपी तांत्रिक कामासाठी जेई मिळावा अशी मागणी केली. सूत्रसंचालन कृषी विभागाचे प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयावरून वादळ
महामार्गात खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याचे काम सुरू आहे. मंत्री दौऱ्यावर येत असल्याने काम होत असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समजले. आजच्या आमसभेत या विषयावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ व काँग्रेसचे युवक रत्नागिरी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद शिरवलकर यांची शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर आमदारांनी या वादाला पूर्णविराम दिला.

तहसील उशिरा आल्याने आमदारांनी सुनावले
आजची आमसभा ११.३० वाजता सुरू झाली. लोकप्रतिनिधींसह सर्व अधिकारी वेळेत उपस्थित होते. पावणेबारा वाजता तहसीलदार यांचे आगमन होताच वेळेत न आल्याबाबत आमदार नाईक यांनी सुनावले. त्यावेळी आपण ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.

आमची धोरणे वेगळी आहेत - नाईक
आम्ही सत्तेत असलो तरी विरोधाला विरोधच राहणार. भाजपाने चुकीची भूमिका केली तर आम्ही समर्थन करणार नाही. आमची धोरणे वेगळी आहेत असे श्री. नाईक यांनी सांगितले. सुरवातीला चौपदरीकरणाबाबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. त्यानंतर एक तासाने भाजपाच्यावतीने जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

सतीश सावंत यांचे मार्गदर्शन घेऊ
विकासात्मक कामात आमचा विरोध राहणार नाही. कोणतचीही विकासकामे करतांना जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निश्‍चितच मार्गदर्शन घेऊ असे श्री. नाईक यांनी सांगून आमसभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com