कुडाळात एसटी बसचालकाची आत्महत्या

कुडाळात एसटी बसचालकाची आत्महत्या

कुडाळ - येथील आगारातील एसटी बसचालकाने शहरातील एका हॉटेलमध्ये मैत्रीण सोबत असताना तिच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी घडला. आपण बाथरूमला गेले असता त्याने आत्महत्या केल्याचा त्या मैत्रिणीचा दावा आहे. हा प्रकार संशयाला जागा ठेवणारा असल्याने पोलिसांनी त्या मैत्रिणीची चौकशी सुरू केली आहे. जयेंद्र गोविंद कोनकर (वय ४२, रा. म्हापण-खालचीकोनीवाडी) असे मृताचे नाव आहे. तो विवाहित आहे. ड्यूटी संपवून थेट हॉटेलच्या रूमवर मैत्रिणीला भेटल्यानंतर त्याने हे कृत्य केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - जयेंद्र हा येथील आगारात गेली पाच वर्षे चालक होता. तो मूळ म्हापणचा असून, आठ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. पत्नी, दोन मुले, आई असा त्याचा परिवार आहे. आज त्याने कुडाळ-परुळे-चिपी ही गाडी आगारात आणून दुपारी दीड वाजता ड्यूटी संपविली. दोनच्या सुमारास तो शहरातील एका हॉटेलमध्ये गेला. तेथे आधीच त्याची मैत्रीण आलेली होती. हॉटेलमधून रूमची किल्ली घेऊन ते दोघेही आत गेले. यानंतर त्याने आत्महत्या केली.

मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार ती बाथरूमसाठी गेली. त्याचवेळी जयेंद्रने तिची ओढणी घेऊन पंख्याला अडकवत गळफास लावून आत्महत्या केली. बाथरूममधून परतल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने ओढणी कापून त्याला खाली घेतले; मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.
तिने जयेंद्रच्या मोबाईलवरून त्याच्या आईला याची कल्पना दिली.

घटनास्थळी त्याची आई पोचली. ही घटना दुपारी दोन ते सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. साडेपाच-सहाच्या दरम्यान पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी म्हापणमधील ग्रामस्थ, एसटी आगारातील कर्मचारी पोचले. पोलिस उपनिरीक्षक गवस यांनी पंचनामा केला.

मृत्यूचे गूढ
तो मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये अशा स्थितीत सापडल्याने खळबळ उडाली. त्या मैत्रिणीने ओढणी कापण्यासाठी काय वापरले याचाही उलघडा झालेला नाही. शिवाय घटना घडल्यानंतर आरडाओरड झाली नसल्याचेही समजते. जयेंद्र यांच्या हातून अलीकडे बसचे अपघातही झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com