मुंबई महामार्ग खड्डेमय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

कुडाळ - दोन दिवसांत पडलेल्या पावसातच मुंबई महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली. खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कुडाळ - दोन दिवसांत पडलेल्या पावसातच मुंबई महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली. खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोकणात गेल्या दोन दिवसांपासूून चांगला पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतकरीराजाने शेतीच्या हंगामाला सुरवात केली आहे. दरम्यान, या दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे ते झाराप दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पाऊस पडत असताना या महामार्गावर काही ठिकाणी कामही सुरू होते. सदरचे काम थांबविण्याबाबत ग्रामस्थ, प्रवासी तसेच मनसेचे तालुकाध्यक्ष बाबल गावडे यांनीसुद्धा पाठपुरावा केला होता. भर पावसात कामे सुरू होती. आता या रस्त्यावर खड्डे पडल्याने खड्ड्यामध्ये पाणी साठवण होते. त्यामुळे वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या खड्ड्याला मलमपट्टी करण्याचे काम माती टाकून केले जात आहे. मात्र, पुन्हा ही माती वाहून जाऊन खड्डेमय अवस्था होते. रस्त्यावर सर्वत्र मातीमुळे चिखल दिसून येतो. अशा वेळी अपघातही होऊ शकतो.

ग्रामीण भागातील रस्त्यांचीही  हीच अवस्था असून, कुडाळ तालुक्‍यातील बऱ्याच रस्त्यांची कामे मे-जूनच्या कालावधीत झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही ठिकाणी कामे सुरू होती. मुंबई-गोवा महामार्गानजीक साळगावमार्गे माणगावकडे जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भल्यामोठ्या  खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वाहनांचेसुद्धा नुकसान होऊ शकते. खड्डे पडल्यानंतर दिखाऊ मलमपट्टी करण्यापेक्षा निकषानुसार रस्त्याचे कामकाज झाले पाहिजे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.