‘लांजा एक्‍स्प्रेस’ने ४०० मीटर अंतर कापले ६१ सेकंदात!

प्रकाश पाटील
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

आर्या सिनकरची कामगिरी- राष्ट्रीय पातळीवर करणार राज्याचे नेतृत्व
सावर्डे - जागतिक स्तरावर भारताचा झेंडा रोवणाऱ्या ‘सावरपाडा एक्‍स्प्रेस’ कविता राऊत आणि रिओ ऑलिंपिकमध्ये धावण्यात करिष्मा दाखवणाऱ्या ललिता बाबर या ग्रामीण भागातील कन्यांनी देशभरात खेडूत मुलींना नवी प्रेरणा दिली आहे. त्यांचा आदर्श घेत लांजा येथील आर्या किशोर सिनकर हिने शालेय वयातच मैदानी क्रीडास्पर्धेत ४०० मीटर अंतर ६१ सेकंदांत पार करून राष्ट्रीय स्तरावर भरारी घेण्याचे संकेत दिले आहेत.

नुकत्याच डेरवण (ता. चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या क्रीडा संकुलामध्ये आयोजित राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आर्या सिनकरची ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४०० मीटरचे अंतर तिने केवळ ६१ सेकंदांत पार करत साऱ्यांनाच आश्‍चर्यचकित केले. या आधी आर्याने राज्यस्तरावर १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कास्य अशी पदके पटकावली आहेत. तालुका आणि जिल्हास्तरावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. आर्या ही सामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी डेरवण येथे ॲथलेटिक्‍स बनण्याच्या इराद्याने डेरवण एस. व्ही. जे. सी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल शिकत आहे. तिच्या यशाबद्दल अनेकाकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या यशात प्रशिक्षक शिवनंदन रसाळ व क्रीडासंकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.

दररोज पाच तासांचा सराव
डेरवण येथील व्हीजेसीटी क्रीडासंकुलामध्ये सराव करत असलेल्या आर्याने धावपटू म्हणून नाव कमवायची जिद्द बाळगली आहे. त्यासाठी दररोज ती पाच तास सराव करते. तालुका, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावरही तिने कोकणचे नाव रोशन केले. आता राष्ट्रीय स्पर्धेत ती राज्याचे नेतृत्व करणार आहे.