उकिरड्यावर जगणाऱ्या गुरांची मृत्युयात्रा... 

अमित गवळे 
शुक्रवार, 31 मार्च 2017

पाली - उन्हाचा तडाखा वाढत असताना गुरांसाठी हिरव्या, तसेच सुक्‍या चाऱ्याचाही अभाव निर्माण झाला आहे. मोकाट गुरांचे तर अन्नपाण्याविना हाल होऊ लागले आहेत. अशी मोकाट गुरे मग शहर किंवा गावाच्या उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. यातूनच त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

पाली - उन्हाचा तडाखा वाढत असताना गुरांसाठी हिरव्या, तसेच सुक्‍या चाऱ्याचाही अभाव निर्माण झाला आहे. मोकाट गुरांचे तर अन्नपाण्याविना हाल होऊ लागले आहेत. अशी मोकाट गुरे मग शहर किंवा गावाच्या उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. यातूनच त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेपालक आपल्या गुरांना चरण्यासाठी मोकाट सोडून देत आहेत. चरण्यासाठी गवत शिल्लक नसल्याने मग ही गुरे कोणाच्या परसात किंवा शेतात घुसतात व नुकसान करतात; तर बऱ्याच वेळा ही गुरे गाव व शहराच्या उकिरड्यावर व कचरा कुंड्यांमध्ये टाकलेले अन्न पदार्थ, कचरा नाईलाजाने खातात. अनेकदा टाकून दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी-अधिक प्रमाणात प्लास्टिक जातेच. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते. अन्नाच्या शोधात सतत चालण्याने त्यांची ऊर्जा कमी होते, अशक्तपणा येतो. कचराकुंड्यांमध्ये व उकिरड्यावरील कचऱ्यात धातू, तसेच अनकुचीदार वस्तू, जसे की घरगुती वापराची सुई, इंजेक्‍शनच्या सुया, खिळे आदी घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहोचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते व त्यामुळे गुरांचा मृत्यूही ओढवतो. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यांचाही मृत्यू होतो. मेलेल्या गुरांच्या मृतदेहात मोठ्या प्रमाणात घातक जंतूंची वाढ झालेली असते. त्यामुळे गुरांचे मृतदेह उघड्यावर न टाकता जमिनीत गाडून टाकावेत, असा सल्ला पशुवैद्यक अधिकारी देत आहेत. कारण अशा मृतदेहांची हाडे इतर प्राण्यांनी चघळल्यास त्यांनाही जंतुबाधा होते. हे दुष्टचक्र सुरूच राहते. त्यामुळे गुरांना मोकाट सोडू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. 

शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. कचऱ्यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्न पदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. मानवी खाद्य हे जनावरांसाठी नाही. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यूही होऊ शकतो. 
-डॉ. आर. बी. काळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड. 

नागरिकांना सल्ला 
-प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. कचरा कुंडीत कचरा टाकताना तो प्लास्टिकच्या पिशवीत टाकू नये. 
- ओला व सुका कचरा वेगळा करूनच तो कचरा कुंडीत टाकावा. 
- विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करावे. 
- शेतकऱ्यांनी जनावरांना खाण्यासाठी मोकाट न सोडता त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जीवन अंगिकारणे गरजेचे आहे, असे मत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. बी. काळे यांनी व्यक्त केले. 

Web Title: Living on cattle