पोलिसांच्या मध्यस्थीने शिरवलीतील जुना वाद मिटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

लोणेरे (ता. माणगाव) - माणगाव तालुक्‍यातील शिरवली गावातील दोन गटांमध्ये 2010 पासून असलेला वाद गोरेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला आहे.

लोणेरे (ता. माणगाव) - माणगाव तालुक्‍यातील शिरवली गावातील दोन गटांमध्ये 2010 पासून असलेला वाद गोरेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला आहे.

शिरवली गावात सात वर्षांपासून दोन गटांत वाद होता. यंदा दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनादरम्यान गावाचे ग्रामदैवत काळभैरव मंदिराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले होते. एका गटाने हे कुलूप लावल्याने दुसरा गट आक्रमक झाला होता. ही माहिती गोरेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विक्रम जगताप यांना समजल्यावर त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांना पाठवून परिस्थितीचा आढावा घेतला. मंदिरातील वस्तू चोरी होऊ नये यासाठी मंदिराला कुलूप लावल्याचे मंदिराचा ताबा असलेल्या गटाने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या पुढाकाराने मंदिर खुले करण्यात आले.

गावातील एका गटाकडे मंदिराचा ताबा राहील व दुसरा गट मंदिर वापरणार नाही, असे तोंडी ठरले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गावातील वातावरण सतत तणावग्रस्त असल्याने गावात उत्सव साजरे होण्यासही अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक जगताप व उपनिरीक्षक खोत यांनी हा वाद मिटवण्याचे ठरवले. त्यांनी पोलिस ठाण्यात ग्रामस्थांची बैठक घेतली. चार तास झालेल्या चर्चेनंतर नवीन समिती स्थापन करण्यात आली. ही समिती 5 सप्टेंबरपासून काम पाहत आहे. या पुढे सर्व सण गुण्यागोविंदाने साजरे करण्याचा ठराव घेण्यात आला. मंदिरात महाआरती करण्यात आली. त्या वेळी महिलांसह 300 ग्रामस्थ उपस्थित होते. आरतीनंतर तोंड गोड करून ग्रामस्थांनी एकत्र राहण्याची हमी पोलिसांना दिली. विजय शिंदे, ग्राममंडळ व मुंबई मंडळ यांनी पोलिसांना सहकार्य केले. गावच्या नव्या समितीमध्ये महादेव पवार, सखाराम अंधेरे, नीलेश शिंदे, तुकाराम डोंगरे, बाळाराम पवार, बाबूलाल पवार, चंद्रकांत किजबिजे यांचा समावेश आहे.